रिक्षावाला ते मायानगरीचा PRO, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विदर्भपुत्र राजू कारिया कालवश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 07:24 PM2020-11-03T19:24:39+5:302020-11-03T19:27:57+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णीचे मूळ रहिवासी : ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी
यवतमाळ : अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत आर्णी सारख्या ग्रामीण भागातून थेट मुंबईच्या मायानगरीत पाय रोवणारे राजू कारिया (६८) यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. विदर्भातील पहिले आणि ६५० पेक्षा अधिक सिनेमांची प्रसिद्धी करणारे भारतातील एकमेव पीआरओ म्हणून त्यांची ख्याती आहे. सेलिब्रेटी सिनेकलावंतांसोबत सलोख्याचे संबंध असलेल्या कारिया यांनी मूळ यवतमाळ जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे संबंध शेवटपर्यंत जपले.
तालुक्यातील आर्णी हे त्यांचे मूळ गाव. केवळ सातवीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी बरीच वर्षे यवतमाळातही घालविली. दत्त चौकात अनेक वर्षे त्यांनी राजू टी स्टाॅल चालविले. परंतु शिक्षणादरम्यानच त्यांना चित्रपट क्षेत्राची प्रचंड आवड असल्याने वयाच्या वीसाव्या वर्षीच त्यांनी मुंबई गाठली. तेथे कुणीही गाॅडफादर नव्हते. अशा वेळी मोठ्या स्टुडिओच्या बाहेर त्यांनी ऑटोरिक्षा चालक म्हणून काम केले. स्टुडिओत जाणाऱ्या-येणाऱ्या एक्स्ट्रा आर्टिस्टसोबत ओळख वाढवून राजू कारिया यांनी स्टुडिओमध्ये प्रवेश मिळविला. सुरुवातीची काही वर्षे त्यांनी स्वत:ही एक्स्ट्रा आर्टिस्ट म्हणून चित्रपटांमध्ये काम केले. शिक्षण कमी असले तरी अंगभूत कलागुणांमुळे त्यांनी मोठमोठ्या कलाकारांची दाद मिळविली. त्यातूनच चित्रपट जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द बहरली. अत्यल्प काळात ६५० पेक्षा जास्त सिनेमांचे पीआरओ म्हणून काम करणारे ते भारतातील एकमेव पीआरओ आहेत. या कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले. तर विदर्भातील पहिले चित्रपट जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे.
यवतमाळातील मित्र परिवार शोकमग्न
दोन वर्षांपूर्वी त्यांना शुगरचा आजार जडल्यावर मध्यंतरी एक पाय कापावा लागला. तरीही हसत हसत त्यांनी काम सुरू ठेवले होते. यवतमाळातील अविनाश पाचकवडेंसारख्या जुन्या मित्रांसोबत त्यांचा नित्य संवाद होता. मंगळवारी आजारामुळे त्यांचे निधन झाल्याने राज्यभरातील चाहत्यांसह यवतमाळातील मित्र परिवारही शोकमग्न आहे. राजू कारिया यांच्या मागे पत्नी, दोन मुली, नात असा आप्त परिवार आहे