महागावातील घनकचऱ्याची समस्या बनली बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:48 AM2021-08-17T04:48:06+5:302021-08-17T04:48:06+5:30
कचरा जाळून जागेवरच विल्हेवाट,पुस नदी नदीलगत कमळेश्वर मंदिर परिसरात रस्त्यावरच कचर्याचा खच कचरा जाळून जागीच विल्हेवाट : पूस नदीलगत ...
कचरा जाळून जागेवरच विल्हेवाट,पुस नदी नदीलगत कमळेश्वर मंदिर परिसरात रस्त्यावरच कचर्याचा खच
कचरा जाळून जागीच विल्हेवाट : पूस नदीलगत कमळेश्वर मंदिर परिसरात कचऱ्याचा खच
महागाव : घनकचरा व्यवस्थापनावर नगरपंचायत प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करूनही व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरली आहे. कंत्राटदाराने मनमानी कारभार सुरू केल्याने शहरातील घनकचरा नागरिकांसाठी डोकेदुखी बनला आहे. शहरात विविध ठिकाणी साचलेल्या कचऱ्याची जागेवरच जाळपोळ करून विल्हेवाट लावली जात आहे.
डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेऊन कचरा साठविणे अनिवार्य असतानाही कंत्राटदार उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहे. त्यामुळे येथील घनकचरा व्यवस्थापन सातत्याने वादग्रस्त ठरत आहे. नगरपंचायतीने एकेकाळी केवळ २४ लाखांत घनकचरा व्यवस्थापन सांभाळले होते. आता मात्र हा आकडा अर्ध्या कोटीपेक्षा जास्त होऊनही कचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. नगरपंचायतीने संबंधित कंत्राटदाराला घनकचऱ्यासाठी दोन वाहने भाडेतत्त्वावर दिलेली आहेत. त्यातील एक वाहन नादुरुस्त झाल्याने बंद अवस्थेत होते. कंत्राटदाराने वाहनाच्या देखभाल दुरुस्तीकडेही दुर्लक्ष केले. दरम्यान, ‘लोकमत’ने हा प्रकार उजेडात आणल्यानंतर नगरपंचायतीने कंत्राटदारास कारणेदाखवा नोटीस बजावून कंत्राट रद्द करण्याची तंबी दिली होती. अखेर कंत्राटदाराने प्रशासनाची मनधरणी करून कंत्राट कायम ठेवले; परंतु काही दिवसांतच पुन्हा मनमानी सुरू केली आहे. नगरपंचायतीने घनकचऱ्यासाठी शहरातलगत भाडेतत्त्वावर जागा घेतली असतानाही शहरातच विविध ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचविले जात आहेत. पूस नदीच्या काठावर, कमळेश्वर मंदिराच्या परिसरात कचऱ्याचा खच पडलेला आहे. श्रावण मास असल्याने भाविकांची दररोज ये-जा आहे. त्यावेळी कचऱ्याच्या दुर्गंधीने भाविकांची गैरसोय होत आहे. याशिवाय दवाखान्यातील इंजेक्शन, औषधाच्या बाॅटल व इतर टाकावू साहित्य येथेच फेकले जात आहे. त्यातून नागरिकांच्या आरोग्यास धोका होण्याची भीती आहे.
कोट
घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराला आम्हीसुद्धा त्रासलो आहोत. त्यामुळे लवकरच यासंदर्भात ठोस निर्णय घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल.
- सूरज सुर्वे
मुख्याधिकारी, नगरपंचायत महागाव