पालिकेत जनतेचे प्रश्न अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:42+5:30
शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गंभीर असतानाही पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी यवतमाळ नगरपरिषदेकडे वेळ नाही. नागरिकांच्या अनेक तक्रारी पालिकेच्या विविध विभागात धूळ खात पडून आहे. समस्या निकाली काढण्यासाठी कर्मचारी अपुरे असल्याचे कारण पालिकेकडून सांगितले जाते, तर किती काळ प्रश्न निकाली निघणार नाही हा नागरिकांचा प्रश्न आहे.
शहरात कचरा, रस्ता, पथदिवे, सांडपाणी आदी समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्या आहेत. याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरपालिकेकडे तक्रारी करतात. पावसाचे आणि सांडपाणी तुंबलेले असतानाही सहा-सहा महिने तक्रार निकाली काढली जात नाही. सांडपाण्यामुळे होणारे परिणाम गंभीर असतानाही पालिका प्रशासन मात्र उदासीन आहे.
अनेक भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या नाही. घर परिसरातच गटार तयार झाली आहेत. त्यात वाढलेला डासांचा प्रादुर्भाव आणि सुटणारी दुर्गंधी जीवघेणी ठरत आहे. घंटागाड्या नियमित येत नसल्याने घरातला कचरा परिसरात जागा मिळेल त्या ठिकाणी नाईलाजाने टाकावा लागतो. अनेक भागातील पथदिवे बंद आहे. पाऊस लांबल्याने वाढलेली झुडपं अजूनही हिरवीगार आहेत. त्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा मुक्त संचार आहे. अगदी वर्दळीच्या रस्त्यावरही ही जनावरे दृष्टीस पडतात. याविषयीच्या तक्रारी नगरपरिषदेकडून दुर्लक्षित आहे. अभियंता नाही, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे आदी कारणांचा पाढा पदाधिकारी आणि प्रशासनाकडून वाचला जातो. याचा अनुभव अनेकांना येत आहे. वॉर्डाशी संबंधित नगरसेवकांना तर आपल्या जबाबदारीविषयी कुठलेही भान नसल्याचे दिसून येते. वॉर्डात अपवादानेही त्यांची चक्कर होत नाही. परिणामी समस्या दीर्घकाळपर्यंत कायम राहात आहे.
छत्रपती सोसायटीत शेजारी त्रस्त
उमरसरा परिसरात असलेल्या छत्रपती सोसायटीत शेजाऱ्याने सांडपाणी मोकळे सोडून दिले. याचा त्रास होत असल्याची तक्रार विलास हरिभाऊ देशमुख यांनी यवतमाळ नगरपरिषदेकडे केली. तक्रारीवर काय कारवाई झाली याची चौकशी करण्यास गेलेल्या देशमुख यांना नगरपरिषदेकडून आमच्याकडे अभियंता आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याचे उत्तर मिळाले. कर्मचाऱ्यांचा तुटवडा केव्हा भरून निघणार आणि समस्या कधी निकाली निघेल, हा त्यांचा प्रश्न आहे.