राज्यातील सर्वच पिकांचे उत्पादन घटणार; सर्वेक्षणातील अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:25 AM2018-02-03T11:25:44+5:302018-02-03T11:28:08+5:30
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे.
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खरीप व रबी हंगामात जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज शासनाच्या एका सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. यामागे निसर्गाच्या लहरीपणासह विविध कारणे सांगितली जात आहेत.
पीक आणेवारीच्या धर्तीवर राज्यात खरीप व रबी हंगामात पिकाचे उत्पादन कसे राहू शकते, याचे सर्वेक्षण केले जाते. कमी मुदतीच्या पिकासाठी दोन तर दीर्घ मुदतीच्या पिकासाठी चार असे अंदाज वर्तविले जातात. प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येक भागात सर्वेक्षण करून अंतरिम अहवाल तयार केला जातो. २०१७-१८ चा दुसरा सर्वेक्षण अहवाल नुकताच पुढे आला. २०१६-१७ च्या अंतिम अहवालासोबत तुलना केली असता यंदाच्या दुसऱ्या अहवालात बहुतांश पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज वर्तविला गेला आहे. त्यामध्ये भात, गहू, ज्वारी, मका, तूर, उडीद, चना, भूईमूग, सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. त्याचवेळी ऊस उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३४ टक्क्याने अर्थात एक कोटी ७२ लाख १८ हजार ६०० टनाने वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे.
तुरीचे उत्पादन चक्क अर्ध्यावर
या अहवालानुसार, सर्वाधिक फटका हा तूर पिकाला बसणार आहे. तुरीचे उत्पादन ५१.०७ टक्क्याने घटण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्या खालोखाल गहू, भूईमूग, भात, उडद या पिकांचा समावेश आहे.
धान्य-तेलबिया उत्पादनात घट
एकूणच धान्याचे उत्पादन २५.०२ टक्क्याने तर तेलबियांचे १८.०१ टक्क्याने घटण्याचा अंदाज आहे. पिकांचे आणखी दोन सर्वेक्षण बाकी असून त्यात उत्पादनात पुन्हा घट दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी उत्पादनातील ही घट शासनाच्या शेतकरी व कृषी क्षेत्राकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा परिणाम मानला जातो.
कपाशीला ४५ लाख गाठींचा फटका
यंदाच्या हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत कपाशीचे उत्पादन तब्बल ४३ टक्क्याने घटण्याचा दुसऱ्या सर्वेक्षणातील अंदाज आहे. आतापर्यंतच्या पीक पाहणीत कपाशीच्या ४५ लाख ६६ हजार २०० गाठींचा (एक गाठ म्हणजे १७० किलो कापूस) फटका बसू शकतो. कपाशीवर या हंगामात गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले होते. हे आक्रमण रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन राज्यात सुमारे ५० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर हजारो बाधित झाले. उत्पादनातील ४३ टक्क्यांची घट पाहता कापसावर बोंडअळीचा हल्ला खरोखरच किती तीव्र असेल याचा अंदाज येतो.