सव्वा हेक्टरात दोन लाखांचे उत्पादन
By admin | Published: February 27, 2015 01:32 AM2015-02-27T01:32:27+5:302015-02-27T01:32:27+5:30
पारंपरिक शेतीला फळपिकाची जोड दिल्यास परंपरेने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यास आर्थिक आधार मिळू शकतो हे हिवरी येथील शेतकरी शे.रशीद शे.महम्मद यांनी दाखवून दिले आहे.
लोकमत प्रेरणावाट
यवतमाळ : पारंपरिक शेतीला फळपिकाची जोड दिल्यास परंपरेने डबघाईस आलेल्या शेतकऱ्यास आर्थिक आधार मिळू शकतो हे हिवरी येथील शेतकरी शे.रशीद शे.महम्मद यांनी दाखवून दिले आहे. कापूस, सोयाबीन या पिकासोबतच १.२० हेक्टरात पपई हे फळपीक
घेवून यापासून वार्षिक एक लाख ७५ हजाराचे उत्पन्न त्यांनी मिळविले
आहे.
शे.रशीद शे.महम्मद यांच्याकडे चार हेक्टर शेतजमीन आहे. ते परंपरेने कापूस, सोयाबीन, गहू या पिकाचे उत्पन्न घेतात. दरम्यान त्यांनी कृषी विभाग आणि आत्मा योजनेंतर्गत फळपिकांची माहिती घेवून त्याबाबतचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पपई हे पीक घेण्याचे ठरविल्यानंतर सन २०१२-१३ मध्ये १.२० लाख हेक्टरवर लागवड केली. १२ रुपये प्रती झाड याप्रमाणे पपईची १६०० रोपे विकत घेतली. कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर ठिंबक सिंचन संच आणि पाच एचपीचा इलेक्ट्रीक मोटर पंप उपलब्ध करून दिला. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत क्षेत्र विस्तार योजनेतून ५० टक्के अनुदानावर किटकनाशके आणि खते उपलब्ध करून दिली. लागवडीनंतर ११ महिन्यांनी पपईच्या काढणीस सुरुवात झाली. १.२० हेक्टरमध्ये एकूण २५ टन इतके उत्पादन झाले. यासाठी एकूण ४० हजार इतका खर्च आला. खर्च वजा जाता प्रती टन सात हजार याप्रमाणे एक लाख २५ हजार इतका निव्वळ नफा त्यांना झाला.
पारंपरिक पिकांसोबत पपईतूनही चांगले उत्पन्न मिळाल्याने शे.रशीद शे.महम्मद यांना चार हेक्टर शेतात एकूण तीन लाख ३३ हजार निव्वळ नफा शिल्लक राहिला आहे. कृषी विभागाने फळपिकाबाबत दिलेल्या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढला. ठिंबक सिंचन संचामुळे पिकांना संरक्षित ओलीत मिळू शकले. त्यामुळेच शेत उत्पादनात प्रगती साधता आली, असे शे.रशीद शे.महम्मद यांनी सांगितले. (वार्ताहर)