चारित्र्यावर संशय; गुप्तांगावर चाकूने वार करून पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 02:29 PM2022-03-14T14:29:29+5:302022-03-14T15:44:32+5:30

दारूड्या प्राध्यापकाने पत्नीच्या गुप्तांगावर वार करून तिला ठार मारले. ही संतापजनक घटना आर्णी शहरातील स्वामी समर्थनगरमध्ये रविवारी दुपारी घडली.

professor kills wife over doubt on character in yavatmal arni | चारित्र्यावर संशय; गुप्तांगावर चाकूने वार करून पत्नीचा खून

चारित्र्यावर संशय; गुप्तांगावर चाकूने वार करून पत्नीचा खून

Next
ठळक मुद्देप्राध्यापक पतीचं कृत्य दारूने संसारात कालवले विष आर्णीतील खळबळजनक घटना

यवतमाळ : दारूच्या व्यसनामुळे पती-पत्नीमध्ये सतत उडणारे खटके शेवटी जीवघेण्या भांडणापर्यंत पोहोचले. त्यातच पत्नीच्या चारित्र्याबाबतही नवऱ्याच्या मनात संशयाचे भूत घुसले. त्यातूनच दारूड्या प्राध्यापकाने पत्नीच्या गुप्तांगावर वार करून तिला ठार मारले. ही संतापजनक घटना आर्णी शहरातील स्वामी समर्थनगरमध्ये रविवारी दुपारी घडली.

मारोती विठ्ठल आरके (३५) असे मारेकरी पतीचे नाव आहे. तर त्याच्या संशयाचा बळी ठरून मृत पावलेल्या पत्नीचे नाव विमल मारोती आरके (३०) असे आहे.

मूळात हलाखीची परिस्थिती असलेला मारोती काही वर्षांपूर्वी लोणी येथील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत प्राध्यापक म्हणून नोकरीला लागला. याच काळात कुऱ्हा येथील विमलसोबत त्याचा विवाह झाला. त्यांच्या पोटी समर्थ (८) आणि दत्त (४) ही दोन मुलेही जन्माला आली. सुखाचा संसार सुरू असतानाच मारोतीला दारूचे व्यसन जडले. त्यातच पत्नीच्या चारित्र्याबाबतही त्याच्या मनात संशय निर्माण झाला. आपण शाळेत गेल्यावर पत्नी दुसऱ्यासोबत फिरते, असा त्याचा संशय होता. यातूनच पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण व्हायचे.

रविवारी दुपारी १२.३० वाजता याच कारणातून मारोतीने विमलच्या गुप्तांगावर धारदार चाकूने वार केले. रक्तबंबाळ झालेल्या विमलला सुरुवातीस आर्णीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रक्तस्त्राव काही केल्या थांबत नसल्याने तिला लगेच यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र रात्री २.३० वाजता तिचा मृत्यू झाला.

पतीच्या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव, एपीआय किशोर खंदार, योगेश सुंकलवार, मिथून जाधव, मनोज चव्हाण, अमित झेंडेकर यांनी घटनास्थळ गाठून मारोती आरके याला ताब्यात घेतले. तर रविवारी सकाळी मृत विमलची आई जयवंतीबाई माधवराव मसराम रा. कुऱ्हा यांनी जावयाविरुद्ध आर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. वृत्तलिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

गावभर चर्चा अन् मारेकरी नामानिराळा

रविवारी दुपारी पत्नीला मारहाण केल्यानंतर पसार झालेल्या मारोती आरकेला पोलिसांनी दुपारी ४ च्या सुमारास ताब्यात घेतले. चाैकशीसाठी त्याला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले असता यवतमाळच्या रुग्णालयात पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी धडकली. या खुनाची गावभर चर्चा सुरू असताना मारोती मात्र आपण बायकोला केवळ मारहाण केली. ती थोड्याच वेळात बरी होऊन परत येणार आहे, अशी बतावणी पोलिसांना करीत होता.

Web Title: professor kills wife over doubt on character in yavatmal arni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.