मनाच्या निर्मलतेने समाजाची प्रगती
By admin | Published: May 24, 2016 12:14 AM2016-05-24T00:14:13+5:302016-05-24T00:14:13+5:30
मनामध्ये बदल कसा घडविता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. माणसाचे मन अनेक विकारांनी जर्जर झालेले आहे.
मुनिश्री प्रतिकसागर महाराज : सर्वधर्म सत्संग महोत्सव
यवतमाळ : मनामध्ये बदल कसा घडविता येईल याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. माणसाचे मन अनेक विकारांनी जर्जर झालेले आहे. त्यामध्ये बदल घडविणे काळाची गरज आहे. मनात निर्मलता निर्माण झाली तर आपोआपच समाजाची प्रगती होऊ शकते, असे विचार मुनिश्री प्रतिकसागर महाराज यांनी मांडले. येथील
केसरिया भवनात आयोजित सर्वधर्म सत्संग महोत्सवात ते मार्गदर्शन करत होते.
मुनिश्री प्रतिकसागर महाराज पुढे म्हणाले, मंदिरात बसून व्यापार करावयास लागलेल्या व्यक्तीच्या मनाची अवस्था बदलण्याची अवश्यकता आहे. शेवटी चांगले काय आणि वाईट काय, ही ठरविण्याची ताकद तुमच्या मनामध्ये आहे. परिवर्तन मनुष्याने स्वत: केले पाहिजे, तरच त्याच्या मनामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. वाईट विचारांना, वाईट प्रवृत्तींना आपण मनाच्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवले तर ही गोष्ट तुमच्या चारित्र्यामध्येसुद्धा स्पष्ट दिसायला लागेल यात शंका नाही, असे ते म्हणाले.
माणसात निर्माण झालेल्या अहंकाराविषयी विविध उदाहरणे देत त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सर्वात मोठा कोण, या प्रश्नाची उत्तरे पैशाने माणूस मोठा होतो, पैशाने माणसाची ओळख होते, पैशाशिवाय माणसाला विचारत नाही, अशी दिली जातात. तर कोणी सत्ताही माणसाला ओळख देते, सत्तेशिवाय माणसाची ओळख होत नाही, सत्ता सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगितले जाते. हीच ओळख आज समाजामध्ये दिली जाते. ही ओळख देताना माणूस अहंकार अंगिकारत आहे. यात तो लहान्याला प्रेम आणि मोठ्याला सन्मान देणे विसरून गेला आहे. मोठा कोण आणि त्या मोठेपणामध्ये अर्थ काय, असा प्रश्नही मुनिश्रींनी यावेळी उपस्थित केला.
माणसाला अहंकाराने नष्ट केले आहे. रक्ताच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे. बाहेरच्या व्यक्तींना जवळ केले जात आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असल्याचे मुनिश्री म्हणाले. (वार्ताहर)