तेलंगणातून महाराष्ट्रात येतोय प्रतिबंधित गुटखा; तस्करांवर कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 05:47 PM2024-11-12T17:47:54+5:302024-11-12T17:48:42+5:30
Nagpur : प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शासनाने गुटखा विक्रीला प्रतिबंध घातला असला तरी शहरात तसेच तेलंगणाच्या सीमेवरील पाटणबोरी येथे खुलेआमपणे सुगंधित तंबाखू आणि गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तेलंगणा प्रदेशातून पाटणबोरीमार्गे या गुटख्याची तस्करी होत असून या गोरखधंद्यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
गुटख्यामध्ये असलेल्या मॅग्नेशियम कार्बोनेट या विषारी पदार्थामुळे मुखरोग तसेच कर्करोग होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सुगंधित तंबाखू गुटखा तसेच सुगंधित तंबाखू मिश्रित सुपारीच्या विक्रीवर कडक निर्बंध घातले असून या पदार्थांवर बंदी आणली. त्यासाठी कठोर कायदा केला. परंतु शहरात मात्र सुगंधित तंबाखू, गुटखा व सुगंधित तंबाखू मिश्रित सुपारीची खुलेआम विक्री होत आहे. या गोरखधंद्यात एक मोठे रॅकेट सक्रिय आहे.
पाटणबोरी येथील तस्करांमार्फत आंध्रातून येणारा हा गुटखा पांढरकवडा शहरासह मोहदा, रुंझा, करंजी, पहापळ परिसरात पोहोचविला जातो. अगदी राजरोसपणे सुरू असलेला हा गोरखधंदा मागील कित्येक दिवसांपासून खुलेआम सुरू आहे. परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही. पांढरकवडा येथून तेलंगणा प्रदेशाची सीमा केवळ २३ किलोमीटर अंतरावर असून सीमेला लागूनच असलेल्या पाटणबोरीमार्गे या गुटख्याची तस्करी होते. हा गुटखा अगोदर एका छोट्या वाहनाने पाटणबोरी येथे आणला जात होता. परंतु आता मोठ्या वाहनातून तो आणला जातो. पाटणबोरी येथे गुटखा उतरविल्यानंतर हा गुटखा काही ठराविक आणि विश्वासू व्यक्तींमार्फत पांढरकवडा शहरात तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील पान टपऱ्यांवर नियोजनबद्ध पद्धतीने पोहोचता केला जातो. गुटखा पुड्या पोहोचविण्यासाठी त्यांना चांगली रक्कम दिली जाते. सुगंधी तंबाखू आणि गुटख्यांच्या पुड्या केव्हा पोहोचविल्या जातात याचा सुगावा कुणालाही लागत नाही.
गुटखा तस्करांवर कारवाईची मागणी
गुटखा खाणाऱ्यांचे प्रमाण तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात आहे. गुटखा खाण्यासाठी ते कितीही पैसे मोजायला तयार आहेत. गुटख्याचे भाव आधीच मोठ्या प्रमाणावर वाढले असून तेलंगणातून तस्करी करून आलेला हा गुटखा त्यापेक्षा कितीतरी जास्त भावाने विकला जातो. हा गुटखा पाटणबोरी येथे नेमका कुणाकडे उतरविला जातो, त्याचा साठा करून तो कशा पद्धतीने विक्री केला जातो, याची चौकशी करून गुटखा तस्करांवर कारवाई करण्याची मागणी पांढरकवडा तालुक्यातील नागरिकांकडून केली जात आहे.