मायक्रो फायनान्स एजंटांना गावबंदी

By Admin | Published: March 28, 2017 01:27 AM2017-03-28T01:27:17+5:302017-03-28T01:27:17+5:30

वणी उपविभागातील गावात आता वसुलीसाठी येणाऱ्या मायक्रो फायनांस एजंटांना गावबंदी करण्याचा निर्धार वणी येथील शेतकरी मंदिरात पार पडलेल्या सभेत महिलांनी केला.

Prohibition of micro finance agents | मायक्रो फायनान्स एजंटांना गावबंदी

मायक्रो फायनान्स एजंटांना गावबंदी

googlenewsNext

महिलाशक्ती एकवटली : वणीच्या उपविभागीय सभेत केला महिलांनी निर्धार
वणी : वणी उपविभागातील गावात आता वसुलीसाठी येणाऱ्या मायक्रो फायनांस एजंटांना गावबंदी करण्याचा निर्धार वणी येथील शेतकरी मंदिरात पार पडलेल्या सभेत महिलांनी केला. महिला कर्जमुक्ती संघर्ष समितीचे संयोजक दिलीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा घेण्यात आली. या सभेला उपविभागातील हजारो महिलांनी हजेरी लावली होती.
या सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे अ‍ॅड.वामनराव चटप होते. प्रमुख पाहुणे म्हणून शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, संघर्ष समितीचे संयोजक दिलीप काकडे, पांडुरंग निकोडे, गुरूदेव सेनेचे संयोजक दिलीप भोयर, समन्वयक मिलींद पाटील, घोन्साच्या सरपंच निरूपमा पथाडे, उपसरपंच अनिल साळवे उपस्थित होते. गेल्या डिसेंबर महिन्यात मायक्रो फायनांस कंपनीच्या एजंटांनी गावागावात जबरदस्तीने वसुली करणे सुरू केले होते. या एजंटाच्या त्रासापोटी मारेगाव तालुक्यातील तीन महिलांनी आत्महत्यासुद्धा केली होती. त्यामुळे उपविभागातील महिलांनी या एजंटांना पैैसे न देण्याचा निर्णय केला व उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी कैै.वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी महिलांची सभा घेऊन एजंटांना पैैसे देऊच नका, असा सल्ला दिला होता. महिलांनीही या एजंटलला पैैसे देणे बंद केले होते. मात्र आता काही महिन्याचा कालावधी लोटताच पुन्हा या एजंटांनी महिलांना धमकी देऊन वसुली सुरू केली.
त्यामुळे या कंपन्यांशी संघर्ष करण्याकरिता माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे यांनी महिला कर्जमुक्त संघर्ष समितीची स्थापना केली. सोमवारी येथील शेतकरी मंदिरात उपविभागातील महिलांची बैैठक घेण्यात आली. यावेळी गावात मुजोरीने व धमकी देऊन वसुली करणाऱ्या एजंटांना गावबंदी करा, तसेच यासाठी ग्रामपंचायतीची मदत घ्या, असा सल्ला यावेळी देण्यात आला. त्यामुळे महिलांनीही आता या एजंटांना गावबंदी करू, एजंटांना गावात येऊच देणार नाही व बळजबरी, धमकी देऊन वसुली करणाऱ्या एजंटांची पिटाईसुद्धा करू, असा निर्धार केला आहे.
तसेच या कंपनीमार्फत काही महिलांना बोगस नोटीस बजावण्यात आली असून या नोटीसमुळे महिलांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. मात्र या नोटीसमुळे तुम्हाला धक्कासुद्धा लागणार नाही, असा सल्ला अ‍ॅड.वामनराव चटप यांनी महिलांना दिला. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Prohibition of micro finance agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.