दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज बंद
By Admin | Published: February 19, 2017 12:43 AM2017-02-19T00:43:40+5:302017-02-19T00:43:40+5:30
जिल्हा परिषदेच्या सहा गट व १२ गणांच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी बंद होणार आहे.
गाठीभेटींवर जोर : सोमवारची रात्र महत्त्वाची
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सहा गट व १२ गणांच्या निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी बंद होणार आहे. आता उमेदवारांचा छुप्या प्रचारावर जोर राहणार असून मतदारांच्या गाठीभेटींना वेग येणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात सहा गट आणि त्या अंतर्गत येणाऱ्या १२ गणांची निवडणूक होत आहे. त्यासाठी २१ फेब्रुवारीला मतदान घेतले जाणार आहे. १९ फेब्रुवारीला रात्री १० वाजता जाहीर प्रचाराची मुदत संपणार आहे. त्यानंतर उमेदवार व त्यांच्या पक्षांचा छुप्या प्रचारावर जोर राहणार आहे. यात मतदारांच्या गाठीभेटींना ऊत येणार आहे. प्रत्यक्ष मतदारांना भेटून उमेदवार मतांचा जोगवा मागणार आहे. त्यामुळे रविवार व सोमवारची रात्र महत्त्वाची ठरणार आहे. या दोन रात्रीतूनच सर्व गणीते ‘फिक्स’ होणार आहे.
पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर आता सर्व पक्ष व नेत्यांचे दुसऱ्या टप्प्यातील गट व गणांवर लक्ष केंद्रीत झाले आहे. बहुमतावर या गट व गणांतील निकाल परिणाम करणारे ठरणार आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता या गट व गणांकडे रोखल्या गेल्या आहेत. जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३१ चा आकडा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील सहा गट महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची मतमोजणी २३ फेब्रुवारीलाच होणार आहे. (शहर प्रतिनिधी)
नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
दुसऱ्या टप्प्यातील कुंभा-मार्डी, घोन्सा-कायर, देऊरवाडी-सुकळी, वटफळी-अडगाव, लाडखेड-वडगाव व विडूळ-चातारी या गटात नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यापैकी तीन गट सामान्य महिलांसाठी आरक्षित आहे. त्यातून विजयी झालेल्या महिला उमेदवाराकडे ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र असल्यास त्यांना थेट अध्यक्षपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.