प्रकल्प गुंडाळणार, ७८० जणांची नोकरी जाणार; कृषी संजीवनीची ३० जूनची डेडलाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 06:20 AM2024-05-31T06:20:03+5:302024-05-31T06:21:04+5:30
सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पाेकरा) मुदत ३० जूनला संपत आहे.
सूरज पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, यवतमाळ: सहा वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पाेकरा) मुदत ३० जूनला संपत आहे. त्यासंदर्भात प्रकल्प संचालकांचे पत्र धडकल्याने राज्यातील ७८० कंत्राटी कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
विदर्भ-मराठवाड्यातील १६ जिल्ह्यात प्रकल्पाची अंमलबजावणी २०१८ पासून सुरू झाली हाेती. या प्रकल्पाची मुदत सहा वर्षांसाठी हाेती. ही मुदत ३० जून २०२४ ला संपुष्टात येत आहे. प्रकल्पामार्फत उपलब्ध करून दिलेले कंत्राटी मनुष्यबळ ३० जूनपर्यंत त्यांच्या कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर त्यांची सेवा समाप्त हाेणार आहे. त्यामुळे नेमून दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण करून प्राथमिक अहवाल प्रकल्प कार्यालयास १५ जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी कृषी अधीक्षकांना दिले आहेत.
या जिल्ह्यात हाेता प्रकल्प
हा प्रकल्प राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू हाेता. यात यवतमाळ, अकाेला, वाशिम, बुलढाणा, अमरावती, वर्धा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगाेली, परभणी, जळगाव व नाशिकचा समावेश हाेता.