महाराष्ट्राच्या टोकावर मराठीचे संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:35 PM2019-02-26T21:35:03+5:302019-02-26T21:35:22+5:30

अस्खलित मराठी ही काही पुण्या-मुंबईच्या सारस्वतांचीच मक्तेदारी नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या, जंगलाच्या काठावर वस्ती करणाऱ्या मागासांचीही ती माय आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या काठावरील आदिवासी, गोंड, कोलाम बांधवांच्या मनातही मराठी राजभाषेचा अभिमान जागृत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेलंगणाच्या सीमेवरील महाराष्ट्रीय माणसांचे हे अनोखे ‘मराठी संवर्धन’ साहित्यिकांनाही लाजवणारे आहे.

Promotion of Marathi on the top of Maharashtra | महाराष्ट्राच्या टोकावर मराठीचे संवर्धन

महाराष्ट्राच्या टोकावर मराठीचे संवर्धन

Next
ठळक मुद्देमागास भागात मनाचा विकास : भाषेतून समाज बदलण्याची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अस्खलित मराठी ही काही पुण्या-मुंबईच्या सारस्वतांचीच मक्तेदारी नाही. खेड्यापाड्यात राहणाऱ्या, जंगलाच्या काठावर वस्ती करणाऱ्या मागासांचीही ती माय आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या काठावरील आदिवासी, गोंड, कोलाम बांधवांच्या मनातही मराठी राजभाषेचा अभिमान जागृत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेलंगणाच्या सीमेवरील महाराष्ट्रीय माणसांचे हे अनोखे ‘मराठी संवर्धन’ साहित्यिकांनाही लाजवणारे आहे.
२७ फेब्रुवारीला अवघ्या महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन साजरा होत आहे. मराठीपासून आणि विकासापासून दूर असलेल्या झरीमध्येही मायमराठीची आगळी आराधना सुरू आहे. झरी जामणी तालुक्यात तेलंगणातील तेलगू भाषेचा हेल मराठीत मिसळला आहे. त्यातच गोंडी, कोलामी बोलीभाषांचेच येथे प्रस्थ आहे. अशा मागास क्षेत्रात शुद्ध मराठी टिकविण्यासाठी, रुजविण्यासाठी काही शिक्षकांनी एकत्र येत ‘मराठी भाषा संवर्धन’ ही चळवळ सुरू केली. ‘साहित्यातून शिक्षण आणि शिक्षणातून समाजसेवा’ हे ब्रिद घेऊन काम सुरू आहे. सरेश पेंढरवाड, गणेश बुटे, लक्ष्मण काकरवार, संतोष बर्लावार, प्रवीण ठेंगणे, नागोराव कोम्पलवार, मच्छिंद्र मुरुमवार, उमाकांत तिपर्तीवार, निशांत कपाट, लता वासरवाड, अनामिका पेंढरवाड यांच्या पुढाकारातून ही चळवळ उभी राहिली आहे.
भाषा हे व्यवहाराचे माध्यम आहे. त्यामुळे झरी तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी येथील गावकऱ्यांना भाषेच्या निमित्ताने जागृत करायचे, नंतर भाषेच्या माध्यमातून तालुक्यातील अज्ञान, कुमारी माता, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्याग्रस्तांना मदत अशा विषयांकडे वळवायचे, अशी वेगळी दिशा घेऊन ही चळवळ काम करीत आहे. वाचन प्रेरणा दिन, निबंध स्पर्धा, कथाकथन, शब्दांच्या सहवासात, चारोळी लेखन, अनुवाद लेखन असे उपक्रम प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन राबविले जात आहेत. झरी तालुक्यात पहिले बाल कविसंमेलनही घेण्यात आले. या संमेलनाचे फलित म्हणजे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात येथील दोन मुलांच्या कविता पोहोचल्या.
आज महिला घेणार मराठी उखाणे
झरी जामणीसारख्या बालीभाषेतच गुंतलेल्या तालुक्यातील आया-बाया मराठी राजभाषा दिन साजरा करणार आहे. अस्सल मराठीत त्या उखाणे घेणार आहेत. बोपापूर येथे ‘मराठी संवर्धन’तर्फे खास महिला मेळा घेण्यात येणार आहे. त्यात तळागाळातील महिलांकडून मराठी उखाणे लिहून सादर करून घेतले जाणार आहे.

Web Title: Promotion of Marathi on the top of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.