मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 05:00 AM2020-12-26T05:00:00+5:302020-12-26T05:00:07+5:30

जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. लाखो रुपये किमतीचे घर चोरटे क्षणात फोडतात. याकरिता चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते. इतकेच नव्हे, तर घराला असलेले हँडल आणि कडी चोरटे सहज तोडतात. याकरिता वापरल्या जाणारे साहित्य घरमालक अतिशय स्वस्त दरातले खरेदी करत असल्याचे पुढे आले आहे.

Property worth millions, locks worth hundreds! | मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे !

मालमत्ता लाखोंची, कुलूप शंभराचे !

Next
ठळक मुद्देकुलूप खरेदी करताना काटकसर : चोऱ्या करणाऱ्यांची चैनी; स्वस्त कुलूपांना मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घर बांधताना प्रत्येक गोष्ट निरखून खरेदी केली जाते. कुठलीही काटकसर नको. शिवाय, घर मजबूत आणि सुरक्षित असावे म्हणून घरमालक वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असतात. असे असले तरी या घराला सुरक्षा प्रदान करणारे कुलूप मात्र स्वस्त दरातील खरेदी करण्यात येते. यामुळे चोरट्यांचे फावले आहे. 
जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्यांचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. लाखो रुपये किमतीचे घर चोरटे क्षणात फोडतात. याकरिता चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते. इतकेच नव्हे, तर घराला असलेले हँडल आणि कडी चोरटे सहज तोडतात. याकरिता वापरल्या जाणारे साहित्य घरमालक अतिशय स्वस्त दरातले खरेदी करत असल्याचे पुढे आले आहे. घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना फारसा वेळ लागत नाही. यवतमाळातील कुलूप विक्रेत्यांच्या काही दुकानांत यासंदर्भातील माहिती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बाजारपेठेत साधे कुलूप सर्वाधिक लोकप्रिय आहे. या कुलपाची किंमत २० रुपयांपासून ते १३०० रुपयांपर्यंत आहे. सर्वसाधारण ग्राहक ५० ते ७० रुपये किमतीचे कुलूप खरेदी करतात. महागड्या कुलपाकडे घरमालक चुकूनही पाहत नाहीत. मोर्टिस लाॅक आणि राऊंड पॅडलाॅक याकडे खरेदी करणारे ग्राहक फारसे नसतातच. या कुलपांच्या किमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे विक्रेतेही असे कुलूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवत नाहीत. यामुळे लाखो रुपये किमतीचे घर तकलादू कुलपांमुळे असुरक्षित झाले आहे. ग्राहक कुलूप आणि दार याबाबत अनभिज्ञ असल्याचेच पुढे आले आहे. जिल्ह्यात वर्षभरात १४० घरफोड्या झाल्या आहेत. या घरफोड्यांत चोरट्यांनी सब्बल आणि इतर तांत्रिक साहित्यांचा वापर केला आहे. बहुतांश घरांना साधे कुलूप आणि स्वस्त कुलूप पाहायला मिळाले. यामुळे नागरिकांनी सावध होण्याची गरज आहे.

वर्षभरात झाल्या १४० घरफोड्या
जिल्हाभरात घरफोड्यांचे सत्र वारंवार घडत आहे. जिल्ह्यात वर्षभरात १४० घरफोड्यांची नोंद पोलीस प्रशासनाने घेतली आहे. प्रत्येक तालुक्यात चोरट्यांनी घरांना लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे, अधिक तगडे घर चोरट्यांनी निशाण्यावर धरले आहे. यातील बहुतांश घरांना स्वस्त दरातले कुलूप लागले होते. चोरट्यांना हे कुलूप सहजरित्या फोडता आले आहे. यामुळे पुढील काळात नागरिकांनी सावध होऊन घराची सुरक्षा करणारे कुलूप लावण्याची नितांत गरज आहे.

Web Title: Property worth millions, locks worth hundreds!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर