पुसद विषबाधा प्रकरणी आश्रमशाळेतील मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 01:23 PM2023-08-08T13:23:21+5:302023-08-08T13:24:03+5:30
चौकशी समितीचा अहवाल, बकेटमधून शिळे अन्न वाढतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद
यवतमाळ : पुसद तालुक्यातील हुडी बु. येथील गिरीधारी महाराज विजाभज आश्रमशाळेच्या वसतिगृहातील ५४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समाज कल्याण उपायुक्तांनी तातडीने द्विसदस्यीय समितीची नियुक्ती केली होती. सोमवारी या समितीने आपला अहवाल उपायुक्तांकडे सादर केला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना बकेटमधून शिळे अन्न वाढतानाचे दृश्य तपासणीवेळी सीसीटीव्हीमध्ये आढळले. समितीच्या अहवालानंतर मुख्याध्यापकासह मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव अमरावतीच्या प्रादेशिक उपसंचालक इतर मागासवर्ग यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.
पुसद तालुक्यातील हुडी बु. येथील गिरीधारी महाराज आश्रमशाळेतील ५४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आला होता. विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी आदी त्रास होऊ लागल्याने आश्रमशाळा परिसरातही एकच खळबळ उडाली. त्यावेळी तेथे असलेल्या मुख्याध्यापकांसह इतर शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना पुसद शहरातील तीन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले होते. घटनेची माहिती समजल्यानंतर पालकांसह नागरिकांनीही या रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
शुक्रवारी सायंकाळपर्यंतच ५४ पैकी ४२ विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर शनिवारी उपचार सुरू असलेल्या १२ पैकी सात विद्यार्थ्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले होते. पाच विद्यार्थ्यांवर मात्र रुग्णालयातच उपचार सुरू होते. या सर्व विद्यार्थ्यांची आता प्रकृती चांगली आहे. दरम्यान, घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिळे अन्न खाऊ घातल्याचा आरोप झाला होता.
या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी समाज कल्याण उपायुक्त भाऊराव चव्हाण यांनी दोन सदस्यीय समितीची स्थापना केली होती. पोलिस निरीक्षक आणि समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ लिपिकाने दोन दिवस पुसदमध्ये विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टरांशी चर्चा केली. तसेच अन्न व औषध प्रशासनाकडूनही अहवाल घेतला. त्यानंतर सोमवार ७ ऑगस्ट रोजी समाज कल्याण उपायुक्तांकडे आपला अहवाल सादर केला. अहवालामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिळे अन्न खाऊ घातल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशी समिती सदस्यांनी आश्रमशाळेतील सीसीटीव्हीटीची तपासणी केली असता विद्यार्थ्यांना बकेटमध्ये ठेवलेले शिळे अन्न दुसऱ्या दिवशी सकाळी वाढल्याचे स्पष्ट झाले होते.
आता कारवाईकडे नजरा
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना जेवण दिले त्यावेळी आश्रमशाळेतील कर्मचारी अत्यंत कमी संख्येने उपस्थित होते. समितीच्या या अहवालानंतर उपायुक्तांनी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि मदतनिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केला आहे. या प्रस्तावावर कुठली कारवाई केली जाते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.