टेक्सटाईल झोनसाठी दोन उद्योजकांचे प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 09:29 PM2019-06-06T21:29:42+5:302019-06-06T21:30:26+5:30
गेल्या काही वर्षांपासून गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या टेक्सटाईल झोनमध्ये आता युती सरकारचा कार्यकाळ संपायला आला असताना दोन उद्योजकांनी उद्योग थाटण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले आहे. त्याला औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातून परवानगीची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गेल्या काही वर्षांपासून गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या टेक्सटाईल झोनमध्ये आता युती सरकारचा कार्यकाळ संपायला आला असताना दोन उद्योजकांनी उद्योग थाटण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले आहे. त्याला औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातून परवानगीची प्रतीक्षा आहे.
काही वर्षांपूर्वी यवतमाळात भोयर या विस्तारित एमआयडीसीत टेक्सटाईल झोन जाहीर करण्यात आला. ९७ हेक्टर अर्थात सुमारे अडीचशे एकर जागेत हा झोन निर्धारित आहे. प्रत्येकी दहा हजार चौरस मीटरचे १३ भूखंड तेथे उद्योगांसाठी थाटण्यात आले आहेत. आवश्यक सोई-सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहे. परंतु गेली काही वर्ष या टेक्सटाईल झोनकडे कुणी फिरकलेच नाही. उद्योजकांनी तेथे येऊन आपले उद्योग सुरू करावे या दृष्टीने राजकीय स्तरावरून फारसे प्रयत्न झाले नाही. राजकीय उदासीनता असल्याने प्रशासनानेही मग त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आता भाजप-शिवसेना युती सरकारचा कार्यकाळ अवघ्या चार महिन्यांवर आला आहे. गेली पाच वर्ष किती उद्योग आणले, किती हातांना रोजगार दिले असा प्रश्न जनतेतून विचारला जाण्याची भीती जिल्ह्यातील सात पैकी संख्येने सहा असलेल्या युतीच्या आमदारांना आहे. त्यामुळेच आता सारवासारव केली जात असल्याची माहिती आहे. त्यातूनच एमआयडीसीत नवे उद्योग येण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत असल्याचे सांगितले जाते.
यवतमाळच्या या टेक्सटाईल झोनला अखेर दोन उद्योजकांनी पसंती दिल्याची माहिती आहे. त्यांनी येथे उद्योग थाटण्यासाठी प्राथमिक प्रस्ताव एमआयडीसीच्या मुंबई मुख्यालयाला दिला आहे. प्राथमिक मंजुरीनंतर त्यांना उद्योगासाठी भूखंड उपलब्ध करून दिले जाणार आहे. टेक्सटाईल उद्योगात पाणी शुद्धीकरण प्रकल्प (सीईटीपी) महत्वाचा आहे. परंतु प्रस्तावित या दोन उद्योगात कलरिंगचे (डार्इंग) कोणतेही काम होणार नसल्याने पाणी अशुद्ध होण्याचा प्रश्नच नाही. यामुळे या उद्योगांकडून ‘दूषित पाणी निघणार नाही’ असे लिहून घेतले जाणार आहे. त्यामुळे हे दोन उद्योग तरी किमान टेक्सटाईल झोनमध्ये सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र त्याच्या मंजुरी, भूखंड मंजुरी व अन्य प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष उद्योग सुरू होण्यास आणखी किती कालावधी लागतो हे पाहणेही महत्वाचे ठरते.
बंद उद्योगाची माहिती मागितली
यवतमाळच्या एमआयडीसीत रेमंड हा एकमेव मोठा उद्योग सुरू आहे. त्यालाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. येथील ओरिएंट, हिंदुस्थान हे उद्योग बंद पडले आहे. ओरिएंटच्या मालमत्तेचा न्यायालयाने हर्रास केला. तर हिंदुस्थानचे सेटअप तयार आहे. केवळ तेथे मशीनरीजची आवश्यकता आहे. अलिकडेच या एमआयडीसीच्या कार्यालयाकडे हिंदुस्थान या बंद पडलेल्या उद्योगाची सद्यस्थिती, तेथील वीज पुरवठा, पाणीपुरवठा याबाबत एमआयडीसीच्या मुंबई मुख्यालयातून चौकशी करण्यात आली होती, असे सांगण्यात येते. त्यामुळे हिंदुस्थान कंपनी पुन्हा येथे आपला उद्योग पुन्हा कार्यान्वित करणार काय ? याची चर्चा सुरू झाली आहे.