तुळशीनगर येथे शेतकरीविरोधी मोदी सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:44 AM2021-05-27T04:44:12+5:302021-05-27T04:44:12+5:30
महागाव : तालुक्यातील तुळशीनगर येथे मुख्य चौकात बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भगतसिंग युथ फोरमतर्फे शेतकरीविरोधी मोदी सरकारचा विरोध ...
महागाव : तालुक्यातील तुळशीनगर येथे मुख्य चौकात बुधवारी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व भगतसिंग युथ फोरमतर्फे शेतकरीविरोधी मोदी सरकारचा विरोध करण्यात आला. काळे झेंडे दाखवून काळा दिवस पाळण्यात आला.
२६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांनी २०१३ च्या पूर्वीच्या भूसंपादन कायद्यात २०१५ मध्ये संशोधन केले. मात्र, देशभरातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाने हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर २०१६ मध्ये नोटबंदी, २०१७ मध्ये जाचक जीएसटी करप्रणाली लागू केली. २०२० मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील संपत्ती विकणे सुरू केले. सप्टेंबर २०२० ला कॉर्पोरेटच्या हिताकरिता, शेतकऱ्यांना शेती व शेतमालावर आधारित बाजार व विपणन व्यवस्थेला बरबाद करण्याकरिता संसदेत तीन शेतकरीविरोधी कायदे हुकुमशाहीने पारित केले, असा आरोप यावेळी करण्यात आला.
शेतमाल हमीभावाचा कायदा केल्याशिवाय व असंघटित कामगारांना किमान वेतन, सामाजिक सुरक्षा कायदे लागू केल्याशिवाय दिल्लीच्या सीमेवरून आम्ही परत जाणार नाही, या निर्धाराने सुरू असलेल्या आंदोलनाला २६ मे रोजी ६ महिने पूर्ण झाले. जनतेकरिता हा काळा दिवस आहे. त्यामुळे तालुक्यातील तुळशीनगर येथे काळे झेंडे दाखवून मोदी सरकारचा निषेध करणारे व शेतकरी आंदोलनास समर्थनार्थ फलक दाखविण्यात आले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका संयोजक मयूर राठोड, सम्राट, राजेश, सुशील, श्याम, महेश, नामदेव चव्हाण, प्रवीण राठोड, रणजीत राठोड, अमित वागले व शेतकरी उपस्थित होते.