पठाणकोटवरील दहशतवादी हल्ल्याचा ‘एआयएमआयएम’तर्फे निषेध
By admin | Published: January 10, 2016 02:59 AM2016-01-10T02:59:19+5:302016-01-10T02:59:19+5:30
पठाणकोटवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद्दुल मुस्लीमीनने (एआयएमआयएम) निषेध नोंदविला आहे.
यवतमाळ : पठाणकोटवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहाद्दुल मुस्लीमीनने (एआयएमआयएम) निषेध नोंदविला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
भारत-पाकिस्तान सीमेपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या पठाणकोटच्या एअर बेसला दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य केले. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळत नाही आणि कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत भारताच्या परराष्ट्र सचिवांनी पाकिस्तानसोबत चर्चेत भाग घेऊ नये, अशी एआयएमआयएमची भूमिका असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच एआयएमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदोद्दिन ओवेसी यांना इसीसने दिलेल्या जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणीही एआयएमआयएम शहर शाखेतर्फे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना एआयएमआयएमचे शहर अध्यक्ष शाज अहेमद यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते. (वार्ताहर)