जालन्याच्या घटनेचा निषेध, आंदोलकांनी जाळला गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा

By रूपेश उत्तरवार | Published: September 5, 2023 03:21 PM2023-09-05T15:21:27+5:302023-09-05T15:21:43+5:30

टायर जाळले, वाहतूक रोखली, मराठा आरक्षणाची मागणी

Protesting the Jalanya incident, the protesters burnt the symbolic effigy of the Home Minister | जालन्याच्या घटनेचा निषेध, आंदोलकांनी जाळला गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा

जालन्याच्या घटनेचा निषेध, आंदोलकांनी जाळला गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा

googlenewsNext

यवतमाळ : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुष लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद मंगळवारी यवतमाळात उमटले. मराठा, कुणबी मोर्चाने गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत राज्य शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आर्णी रोडवर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच यवतमाळ शहरात बंद पाळण्यात आला.

मराठा, कुणबी मोर्चाला मंगळवारी अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. स्थानिक शिवतीर्थावर आंदोलकांनी आंदोलनाला प्रारंभ केला. प्रारंभी बसस्थानक चौकातील वाहतूक काही काळ रोखून धरण्यात आली. यावेळी शहराच्या बंदसाठी मोर्चाही निघाला. यानंतर शहरातील दुकाने बंद करण्यात आली. स्थानिक नागपूर-तुळजापूर मार्गावरील आर्णी मार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. मराठ्यांना आरक्षण तत्काळ मिळावे, या मागणीसह जालन्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मार्गावर टायर जाळण्यात आले. याशिवाय गृहमंत्र्यांसह शासकीय यंत्रणेचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. आंदोलक संतप्त असल्यामुळे या मार्गावर २ वाजेपर्यंत वाहतूक ठप्प होती. यामुळे प्रवाशांना आपला मार्ग बदलवावा लागला. 

रुग्णवाहिकेला खुला केला मार्ग

आर्णी मार्गावर आंदोलन सुरू असताना या भागातून एक रुग्णवाहिका जात होती. रस्ता रोको आंदोलनामुळे रुग्णवाहिकेला अडथळा ठरू नये म्हणून आंदोलकांनी मार्ग मोकळा करून दिला.

तीन दिवसात ६५४ बसफेऱ्या रद्द

मराठा आंदोलनामुळे जिल्ह्यात गत तीन दिवसात एसटी महामंडळाच्या ६५४ बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. ४७ हजार ५२७ किलोमीटरचा प्रवास थांबविण्यात आला. यामुळे एसटी महामंडळाचे १५ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले. विभाग नियंत्रक अमोल गोंजारी मंगळवारी स्वत: रस्त्यावर उतरले होते. त्यांनी आर्णी मार्गावरील बसफेऱ्या ३ वाजेपर्यंत रद्द केल्या होत्या.

पोलिस अधीक्षक उतरले रस्त्यावर

आंदोलनादरम्यान शहरातील हल्दीराम शोरूमवर दगड फेकून काच फोडण्यात आली. या घटनेनंतर संबंधित आंदोलनकर्त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड स्वत: रस्त्यावर उतरले होते. त्यांनी यावेळी पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचनाही दिल्या.

पोलिसांची नजर चुकवून प्रतिकात्मक पुतळा जाळला

गृहमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यासाठी आंदोलकांना पोलिसांची नजर चुकवावी लागली. दोराने लटकवून स्ट्रीट लाईटवर फेकला गेलेला हा पुतळा क्षणार्धात जाळण्यात आला. यामुळे काय घडले हे कळण्याअगोदरच पुतळ्याचे दहन झाले.

Web Title: Protesting the Jalanya incident, the protesters burnt the symbolic effigy of the Home Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.