टाकळी प्रकल्पाला पुरेसा निधी देऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 11:49 PM2018-12-15T23:49:47+5:302018-12-15T23:50:19+5:30
तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : तालुक्यातील टाकळी-डोल्हारी प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न विनाविलंब मार्गी लावण्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रकल्पग्रस्त नागरिकांना दिली.
अमरावती येथे आढावा बैठकीकरिता आले असता महाजन यांची शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्रीधर मोहोड यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन सादर केले. तालुक्यातील डोल्हारी गावाजवळ हा प्रकल्प होत असून निधीअभावी काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्प तसेच बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीचे भूसंपादन किंवा खरेदी व गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. प्रकल्पात आज ना उद्या शेती व घर जाणारच या भावनेने नागरिक, गावांचा विकास खुंटला आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्याने शेती विकता येत नाही, संपादित किंवा खरेदीही करता येत नाही. त्यामुळे गावकरी दोन्हीकडून अडकले आहे.
प्रकल्पाच्या विलंबामुळे गावात राजकारण होत असून काही वेगवेगळ्या मार्गाने खोट्या तक्रारी करून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे कोणत्याही तक्रारीचा विचार न करता बुडीत क्षेत्रातील शेतजमिनीची खरेदी, बहुमताने निवडलेल्या जागेवर बुडीत गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली. त्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी हा प्रकल्प बळीराजा चेतना अभियानात समाविष्ट करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच प्रकल्प व बुडीत गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची हमी दिली.
शिष्टमंडळात श्रीधर मोहोड, विजयाताई सांगळे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष पंडित आंबेकर, फुबगावच्या सरपंच विमल बोरकर, उपसरपंच राजेश राठोड, घनापूरच्या सरपंच जयमाला जामकर, नखेगावचे सरपंच संतोष खडसे, फुबगावचे सुशांत इंगोले, डॉ.दिलीप साव, सावकार राठोड, संजय देशमुख, मोहन राठोड, बबन पवार, नीळकंठ बोरकर, भीमराव भोयर, गजानन गाढवे, युवराज नंदागवळी, घनापूरचे निरंजन काळे, संतोष गावंडे, गोपाळ गावंडे, नखेगावचे राजू गोरडे, उदापूरचे रमेश भोयर, शरद सांगळे, उमेश पेंडेकर, दिनेश सांगळे, प्रदीप गीते, तळेगावचे सलीम भाई, अजय राठोड, प्रभूदास गावंडे आदींचा समावेश होता.