स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करा
By admin | Published: March 17, 2017 02:44 AM2017-03-17T02:44:59+5:302017-03-17T02:44:59+5:30
शहरासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेची चार मोठी कामे करण्यात आली.
संजय राठोड : दारव्हा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा प्रारंभ
दारव्हा : शहरासाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेची चार मोठी कामे करण्यात आली. तरीसुद्धा पाण्याची समस्या कायम आहे. नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतर मात्र सर्व नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा झाला पाहिजे, अशी सूचना महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी नगरपरिषदेला दिली.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान (राज्यस्तर) योजनेंतर्गत दारव्हा शहरातील कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेकरिता ३४ कोटी ३४ लाख रुपये मंजूर झाले. या योजनेच्या कामाचा शुभारंभ संजय राठोड यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. विकास कामांकरिता शासन कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु कामाचा दर्जा व तांत्रिक बाजू योग्य नसल्यास नागरिकांना त्याचा पाहिजे तसा लाभ मिळत नाही. त्यामुळे या योजनेचे तसे होता कामा नये, असे ते म्हणाले.
पाणीपुरवठा योजनेसोबतच शहर स्वच्छता, भुयारी गटार, खुल्या जागांचा विकास, रस्ते बांधकाम, पथदिवे आदी कामांसाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, आवश्यक तो निधी मिळवून देवू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
कार्यक्रमाला नगराध्यक्ष बबनराव इरवे, उपाध्यक्ष प्रीती बलखंडे, सभापती आरिफ काजी, प्रकाश दुधे, वैशाली खाटिक, गजेंद्र चव्हाण, रवी तरटे, नगरसेवक प्रकाश गोकुळे, अरविंद निंबर्ते, दीपा सिंगी, सीमा चिरडे, शरद गुल्हाने, जयश्री खरोडे, मीरा कराळे, सुनीता ठाकरे, शुभम गवई, जिल्हा परिषद सदस्य श्रीधर मोहोड, कालिंदा पवार, राधा थरकडे, अश्विनी कुरसिंगे, पंचायत समिती सभापती उषा चव्हाण, उपसभापती पंडित राठोड, सदस्य नामदेव जाधव, साहेबराव कराळे, सुनीता राऊत, सिंधुताई राठोड, सविता जाधव, शारदा दुधे, शारदा मडावी आदी उपस्थित होते. संचालन पोटदुखे, प्रास्ताविक मुख्याधिकारी जी.एस. पवार यांनी केले. आभार पाणीपुरवठा विभाग प्रमुख हिरासिंग राठोड यांनी मानले. जीवन प्राधिकरण, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार नागरगोजे, प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)