जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:41 AM2021-04-08T04:41:19+5:302021-04-08T04:41:19+5:30
महागाव : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यात दारव्हा मतदारसंघातील दिग्रस व दारव्हा तालुक्यातील आठ हजार ...
महागाव : जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. यात दारव्हा मतदारसंघातील दिग्रस व दारव्हा तालुक्यातील आठ हजार ४०० शेतकऱ्यांना पात्र ठरवून लाभ देण्यात आला. मात्र, उर्वरित शेतकरी अद्याप वंचित आहे. त्यांना तत्काळ लाभ् द्यावा, अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दारव्हा विधानसभा मतदारसंघ वगळता इतर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वंचित शेतकर्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, अन्यथा विदर्भ जनआंदोलन संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन उभारण्यात येईल, असे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत विमा कंपन्यांची तत्काळ बैठक बोलावणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे वंचित साडेचार लाख शेतकऱ्यांना विमा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. गतवर्षी शासनाने आवाहन केल्यानुसार, साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला होता. यातून विमा कंपन्यांनी कोट्यवधींची माया गोळा केली. त्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील विशिष्ट तालुक्याला विमा कंपन्यांनी लाभ दिला. हा इतर शेतकऱ्यांवर अन्याय आहे, असे समितीने म्हटले आहे. समितीने विमा कंपन्यांविरुद्ध तत्काळ कार्यवाही करण्याचे निवेदन दिले, अन्यथा ही बाब न्यायालयात नेण्याचा इशारा दिला.