आर्णीत विद्यार्थिनींची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:44 PM2018-10-15T21:44:57+5:302018-10-15T21:45:20+5:30
शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर दामिनी पथकाने येथील विद्यार्थिनींमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला. विद्यार्थिनींना यात सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर दामिनी पथकाने येथील विद्यार्थिनींमध्ये जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेतला. विद्यार्थिनींना यात सुरक्षेसंबंधी मार्गदर्शन करण्यात आले.
शहरात नुकताच एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा उलगडा झाला. या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटकही केली. याप्रकरणी शहरवासीयांनी निषेध मोर्चाही काढला होता. त्यानंतर पोलिसांच्या दामिनी पथकाने रविवारी येथील शासकीय मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनी व पालकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ठाणेदार यशवंत बावीस्कर यांनी पालकांना आपल्या पाल्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच संस्कृती देण्याचे आवाहन केले. यवतमाळ येथील महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या दामिनी पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक विजया पंधरे यांनी मुलींनी आपल्यासोबत कुठलीही वाईट घटना घडल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. शासन महिला अत्याचाराबाबत अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले.
एखादा तरुण मुलींवर वाईट नजर ठेऊन असल्यास मुलींनी तत्काळ दामिनी कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मुलींनी मोबाईलचा वापर कामापुरताच करावा, असे आवाहन अॅड. अरुणा राठोड यांनी केले. मुलींनी पालकांसह आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, आपल्या वागण्याकडे लक्ष द्यावे असेही सांगितले. मुलींनी स्वत:च्या जबाबदाऱ्या समजून घेतल्या पाहिजे, असे अॅड. राठोड यांनी स्पष्ट केले.
यावेळी दिनेश जाधव, महिला पोलीस कर्मचारी अश्विनी कंडारे, विकी राऊत, गृहपाल वर्षा लाकडे, राणी ठाकरे, विद्या देवतळे, सोनाली गरडे आदी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनींच्या विविध शंकांचे पाहुण्यांनी निरसन केले.
विद्यालयासमोर दुचाकी तपासणी
आर्णीतील वातावरण अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त असल्याने पोलिसही जागे झाले आहे. सोमवारी येथील म.द. विद्यालयासमोर आणि शिवनेरी चौकात दुचाकींची तपासणी करण्यात आली. आवश्यक कागदपत्र नसलेल्या २० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. अमित झेंडेकर, मनोज चव्हाण यांनी ही कारवाई पार पाडली.