‘त्या’ शिक्षकाविरुद्ध दिग्रसमध्ये जनक्षोभ
By admin | Published: August 21, 2016 01:31 AM2016-08-21T01:31:09+5:302016-08-21T01:31:09+5:30
पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध दिग्रसमध्ये जनक्षोभ उफाळला आहे.
पोलीस ठाण्यावर मोर्चा : कठोर कारवाई करण्याचे प्रभारी एसडीपीओ गौतम यांचे आश्वासन
दिग्रस : पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यासोबत अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध दिग्रसमध्ये जनक्षोभ उफाळला आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी विद्यार्थी आणि विविध पक्षांतर्फे शहरात मोर्चा काढण्यात आला.
येथील सरुबाई पाटील शाळेच्या पाचव्या वर्गाचा वर्गशिक्षक नीलेश बदुकले याने आपल्या खासगी शिकवणीवर्गात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याच्या घटनेने शहरात चांगलेच तणावाचे वातावरण पसरले. घटनेच्या काही तासातच बदुकलेला पोलिसांनी अटक केली. तर त्या पीडित मुलावर अनैसर्गिक कृत्य झाल्याच्या बाबीला वैद्यकीय अधिकारी वीरेंद्र अस्वार यांनी पुष्टी दिली आहे.
या घटनेनंतर शनिवारी २० आॅगस्टला महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोर्चा सकाळी दहा वाजता येथील शिवाजी चौकातून निघाला. पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या अनिलसिंह गौतम, तहसीलदार किशोर बागडे, ठाणेदार शिवाजी बचाटे यांना कडक कारवाई करावी याबाबत निवेदन दिले. दरम्यान येथील प्रत्येक शिकवणीवर्गात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
आरोपी नीलेश बदुकलेवर कठोर कारवाई होईल. तो कारवाईतून निसटेल अशी कोणतीही चूक पोलिसांकडून होणार नाही, याबाबत प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिलसिंह गौतम यांनी ग्वाही दिली. दरम्यान सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्था चालकांनी घेतला. यावेळी सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या घटनेने पालकात काळजी निर्माण झाली. (प्रतिनिधी)