वनविभागाविरुद्ध जनक्षोभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 09:28 PM2018-01-28T21:28:27+5:302018-01-28T21:28:49+5:30

वाघिणीने ठार मारलेल्या शेतकºयाच्या घरापर्यंत जाण्याची ४८ तास उलटूनही वन विभागाने तसदी घेतली नसल्याने राळेगाव तालुक्यात वन विभागाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो नागरिक राळेगाव ठाण्यावर पोहोचले.

Public outcry against forest division | वनविभागाविरुद्ध जनक्षोभ

वनविभागाविरुद्ध जनक्षोभ

Next
ठळक मुद्देवाघिणीचा बारावा बळी : ‘सीसीएफ’वर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : वाघिणीने ठार मारलेल्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत जाण्याची ४८ तास उलटूनही वन विभागाने तसदी घेतली नसल्याने राळेगाव तालुक्यात वन विभागाविरुद्ध प्रचंड जनक्षोभ निर्माण झाला आहे. रविवारी शेकडो नागरिक राळेगाव ठाण्यावर पोहोचले. मुख्य वनसंरक्षकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. वनविभाग वाघाचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करीत नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला.
गेल्या दीड वर्षांपासून राळेगाव, कळंब, केळापूर या तालुक्यातील दोन डझन गावात नरभक्षक वाघिणीने धुमाकूळ घातला आहे. दर महिन्या-दोन महिन्यात एक बळी वाघीण घेत आहे. दरवेळी शासन वाघबळी कुटुंबांची आर्थिक मदत करून बोळवण करते. परंतु अद्यापपर्यंत या वाघिणीचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला यश आले नाही. दरम्यान लोणी येथील रामा कोंडबा शेंदरे या शेतकºयाचा शनिवारी वाघिणीने फडशा पाडला. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच एकापाठोपाठ एक बळी जात असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. लोणी, वरध परिसरातील शेकडो नागरिक रविवारी राळेगाव पोलीस ठाण्यावर धडकले. ठाणेदार संजय खंदाडे यांना निवेदन देऊन मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. आणखी किती बळी हवे आहेत. वाघिणीचा बंदोबस्त केव्हा करणार, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. संतप्त नागरिकांचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती निमीष मानकर, अरविंद फुटाणे, अरविंद वाढोणकर, अशोक केवटे, प्रवीण कोकाटे, विजय तेलंगे, विनोद भोकरे, बळवंत जगराळे, रवी गलांडे यांनी केले. दरम्यान माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी पोलीस ठाण्यात येऊन कारवाईबाबत विचारणा केली.
उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार हेमंत गांगुर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. शहरातही चौकाचौकात पोलीस तैनात करण्यात आले होते.
नातेवाईकांनी शवविच्छेदन रोखले
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी राळेगावात येऊन आमच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करावी. त्यानंतरच शवविच्छेदन करू दिले जाईल, अशी भूमिका रामाजी शेंदरे यांच्या नातेवाईकांनी घेतली. त्यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत शवविच्छेदन झाले नव्हते. या नातेवाईकांची समजूत तहसीलदार हेमंत गांगुर्डे यांनी काढण्याचा प्रयत्न केला. परंतु वृत्तलिहिस्तोवर शवविच्छेदनाला सुरुवात झाली नव्हती.
कुटुंब उघड्यावर
रामाजी शेंदरे यांचा वाघिणने बळी घेतल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. यापूर्वी शेतात काहीच पिकले नाही. त्यामुळे रबीत निदान गहू पेरुन संसाराचा गाडा पुढे हाकण्यासाठी रामाजी स्वत:च्या नऊ एकर शेतात मशागतीकरिता कुटुंबासह गेले होते. कुटुंबातील इतर सदस्य दुसरीकडे काम करीत असताना वाघाने झडप घालून त्यांच्या नरडीचा घोट घेतला. त्यांच्या मागे पत्नी कमलाबाई, मुलगा नारायण असा परिवार आहे.

Web Title: Public outcry against forest division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.