कर्जमाफी निकषांचे शेतकऱ्यांपुढे जाहीर वाचन
By admin | Published: July 13, 2017 12:15 AM2017-07-13T00:15:12+5:302017-07-13T00:15:12+5:30
राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू केली.
जिल्हा बँकेचा पुढाकार : अध्यक्ष अमन गावंडे यांची माहिती, पिंपरीबुटीतून आज शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू केली. या योजनेचा पहिला टप्प्यात निकषांचे जाहीर वाचन करून नंतर पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. याचा प्रारंभ पालकमंत्र्यांचे दत्तक ग्राम असलेल्या पिंप्रीबुटी येथून गुरूवारी सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी पत्रपरिषदेत दिली.
पालकमंत्री मदन येरावार यांच्या उपस्थितीत कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांच्या यादीचे जाहीर वाचन केले जाईल. त्यासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदारांना आमंत्रित केल्याचे बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी सांगितले. पिंप्रीबुटी हे हातगाव ग्रामविविध कार्यकारी सोसायटीच्या अंतर्गत येते. तेथील पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यावर शेतकऱ्यांना आक्षेप नोंदविता येईल. हे अभियान संपूर्ण जिल्हाभर राबविणार असून त्यासाठी आंदोलनावर असलेल्या ग्रामविविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.
बँकेचे निरीक्षक कर्जमाफीसाठी शासनाने जाहीर केलेल्या निकषांचे वाचन करून पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार आहे. जिल्हा बँकेचे एक लाख २३ हजार ८८५ सभासद कर्जमाफीसाठी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सिंगम यांनी वर्तविला. त्यांना ८३९ कोटींचा लाभ मिळणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. नेमकी कर्जमाफी कधी मिळणार, शासन आदेशानुसार तत्काळ दहा हजारांचा लाभ कधी देणार, याचे उत्तर देण्यास मात्र जिल्हा बँक अध्यक्ष व प्रशासन असमर्थ ठरले.
केवळ पात्र शेतकरी लाभार्थ्यांची यादी तयार करून ठेवण्यासाठी हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगण्यात आले. भविष्यात कर्जमाफीच्या निकषात बदल झाल्यास पुन्हा अशी यादी बनवावी लागू शकते, त्यामुळे या यादीला अंतिम यादी मानता येणार नाही, असेही बँक प्रशासनाने स्पष्ट केले. पत्रपरिषदेला संचालक रवींद्र देशमुख, संजीव जोशी, देवीदास चवरे, सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे आदी उपस्थित होते.