पुसदच्या गुंतवणूकदारांची पाच कोटींनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:21 AM2017-11-24T01:21:48+5:302017-11-24T01:22:40+5:30

अधिक व्याजाचे आमिष देऊन पुसद येथील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

Punasan's investors have fraud of five crores | पुसदच्या गुंतवणूकदारांची पाच कोटींनी फसवणूक

पुसदच्या गुंतवणूकदारांची पाच कोटींनी फसवणूक

Next
ठळक मुद्देअधिक व्याजाचे आमिष देऊन पुसद येथील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : अधिक व्याजाचे आमिष देऊन पुसद येथील शेकडो गुंतवणूकदारांची तब्बल पाच कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी निर्मल इन्फ्राहोम कार्पोरेशन लिमिटेड, छत्तीसगढच्या (एनआयसीएल) दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे आला आहे.
पुसदच्या मोतीनगर भागात एनआयसीएल या कंपनीने काही वर्षापूर्वी कार्यालय उघडले. गुंतवणुकदारांच्या बैठका घेऊन त्यांना २३०० रुपये गुंतविल्यास पाच वर्षात १७ हजार रुपये देण्याचे आमिष दिले. तसेच इतर योजनांमध्ये पैसा गुंतविल्यास किती आर्थिक फायदा होतो याची माहिती दिली. या प्रलोभणाला बळी पडून अनेकांनी वेगवेगळ्या योजनांमध्ये पैसे गुंतविले. मात्र मुदत संपल्यानंतर गुंतवणूकदारांना पैसा परत केला नाही. तब्बल पाच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडे आहे. या प्रकरणी पुसद तालुक्यातील धुंदी येथील जयदेव मारोती भट यांनी पुसद शहरात ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी कंपनीचे सीएमडी अभिषेक सिंग पी. आनंदसिंग चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक हरीश पी. अशोक शर्मा, संचालक फुलसिंग पी. गंगाप्रसाद चौधरी, निरंजन पी. अशोक सक्सेना, निर्मलादेवी आनंदसिंग चव्हाण, लखन गजाधीशप्रसाद सोनी, आशिष आनंदसिंग चव्हाण सर्व रा. शाजापूर (मध्यप्रदेश), एस.एस. राठोड, डी.एस. राठोड रा. चंदीगड, सारिका अ. बारस्कर रा. टिकारी जि.बैलूत (मध्यप्रदेश) आणि पी.एन. मुन्शी रा. श्रीनगर यांच्याविरुद्ध फसवणुकीच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
यवतमाळ शहरात ढोकेश्वर मल्टीस्टेटचे प्रकरण ताजे असताना आता पुसदमध्येही गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याचे पुढे आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास आता पुसद शहर पोलिसांकडून काढून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर, पोलीस उपनिरीक्षक प्रेमदास आडे, राजू झाडे, दीपक आसरकर, विजय पवार, सुनील बोटरे करीत आहे. आता या गुंतवणूकदारांना त्यांचे कष्टाचे पैसे कधी मिळतील याकडे लक्ष आहे.
आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधा
निर्मल इन्फ्राहोम कार्पोरेशनने पुसद तालुक्यात गुंतवणूकदारांची कोट्यवधीने फसवणूक केली आहे. या प्रकरणी ज्यांची फसवणूक झाली त्यांनी आपल्या जवळील कागदपत्रांसह पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांनी केले आहे.

Web Title: Punasan's investors have fraud of five crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.