पूसदच्या बांधकाम कंपनीचा विधानसभेत पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:41 AM2021-03-10T04:41:36+5:302021-03-10T04:41:36+5:30
कामात दर्जा नाही : महागाव-फुलसावंगी रस्त्यात घोळ महागाव : रस्त्याच्या बांधकामात धुमाकूळ घालणाऱ्या पुसदच्या बांधकाम कंपनीचा थेट विधानसभेत पंचनामा ...
कामात दर्जा नाही : महागाव-फुलसावंगी रस्त्यात घोळ
महागाव : रस्त्याच्या बांधकामात धुमाकूळ घालणाऱ्या पुसदच्या बांधकाम कंपनीचा थेट विधानसभेत पंचनामा झाला आहे. विशेष म्हणजे, ज्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादाचा हवाला या कंपनीकडून दिला जात होता, त्याच नेत्याने या कंपनीचे पितळ सभागृहात उघडे पाडले.
कामात दर्जा नसल्यामुळे अनेक कामे कोट्यावधी रुपये खर्च करून अल्पावधीत मातीमोल झाले आहे. नागरिकांच्या तक्रारीवर बांधकाम विभागाचे अधिकारी अहवाल ‘मॅनेज’ करत असल्यामुळे कंपनीचे फावत आहे. परंतु महागाव-फुलसावंगी या १४ किलोमीटर अंतरात २५ कोटी रुपयांचा रस्ता शासनाला आव्हान ठरू पाहत आहे.
१४ किलोमीटर अंतरामध्ये रस्त्याच्या कामात कुठेही लेवल दिसत नाही. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कंत्राटदार कंपनीच्या आर्थिक ओझ्याखाली दबले असल्यामुळे तपासणी अहवाल मॅनेज करू लागले आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत ज्या राजकीय नेत्याच्या भरोशावर कंत्राटदार कंपनीच्या मालकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्या त्या परिसरातील जनतेला राजकीय पाठबळ असल्याची भूल देऊन बळजबरीने कामे करून घेतलेली आहेत, त्याच नेत्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या रस्त्याचा प्रश्न उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम विभागाला उघडे केले आहे. त्यामुळे नेत्याचा वरदहस्त सांगणाऱ्या कंपनीचे पितळ उघडे पडले आहे.
महागाव फुलसावंगी हा एकच रस्ता नाही? तर या रस्त्यावर काम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेल्या अनेक कामांमध्ये नागरिकांच्या तक्रारी आहेत. कामामध्ये दर्जा नाही? पंतप्रधान ग्राम सडक योजना असो की मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असो या कामातील बहुतांश कामे अजूनही अर्धवट स्थितीमध्ये आहेत. जी काम झाली ती अल्पावधीत मातीमोल झालेली आहे. कोठारी बेलदरी सिमेंट काॅंक्रीट रस्ता आठ दिवसांत मातीमोल झाला आहे. अनेक तक्रारी असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य बांधकाम विभाग या कंपनीला ब्लॅक लिस्ट का करत नाही? हा येथील नागरिकांचा सवाल आहे.