नेरमध्ये वांझ बियाण्यांचे पंचनामे कासवगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:28+5:30
नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : उधार-उसणवार करून, दागदागिने गहाण ठेवून, खासगी सावकारांकडून कर्ज घेवून पेरलेले बियाणे वांझ निघाल्याने शेतकऱ्यांचे अवसान गळाले. आता सरकारी खाक्याचा जाच त्यांना सहन करावा लागत आहे. नेर तालुक्यात शेकडो तक्रारी दाखल झाल्या. मात्र पंचनामे अतिशय संथगतीने सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र उगवले नसलेल्या बियाण्यांचे पंचनामे व्हायचे असल्याने त्यांच्यापुढे अडचण निर्माण झाली आहे. तालुक्यात १८० तक्रारी दाखल झाल्या. त्यातील केवळ ५० निकाली काढण्यात आल्या.
कापूस घरातच पडून असल्याने खरिपाच्या पेरणीसाठी पैसा उभा होऊ शकला नाही. बँकांनी कर्ज उपलब्ध करून देण्याचे सौजन्य दाखविले नाही. मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण पैशांची सोय नसल्याने आडाचेदीड करण्यात आले. कसातरी पैसा उभा होवून बी-बियाणे, रासायनिक खते शेतकऱ्यांनी आणली. मजूर टंचाई, पेरणीच्या साहित्याचा अभाव यातून मार्ग काढत बळीराजाने टोबणी, पेरणी केली. आठ-दहा दिवसांचा कालावधी लोटला, पाऊसही झाला, मात्र बियाणे अंकुरले नाही. याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर झालेही तसेच. शेतात टाकलेले अर्धेअधिक बियाणे उगवले नाही.
निकृष्ट बियाणे विक्रेत्यांनी माथी मारल्याच्या निर्णयाप्रत शेतकरी पोहोचले. तक्रार करूनही विक्रेते मानले नाही. ‘आम्ही विक्रेता आहो, उत्पादक नाही’ असा प्रबोधनाचा डोज पाजून शेतकऱ्यांना परत पाठविले. अखेरचा पर्याय म्हणून कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. या विभागाचे अधिकारी, कर्मचारी येतील, पंचनामे करून जातील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतामध्ये नवीन पेरणीच्यादृष्टीने काहीही केले नाही. खूप दिवसांचा कालावधी लोटला जात असतानाही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची पावलं नुकसानग्रस्त काही शेतांकडे वळली नाही.
नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार ?
पेरणीला उशीर झाल्यास उत्पादनात घट येते, याचे भान संबंधितांना राहिले नसल्याचे दिसून येते. अजूनही तक्रारींचे प्रमाण वाढत आहे. आधीच्या तक्रारींनाच हात लागला नाही, तर नवीन तक्रारी केव्हा निकाली निघणार हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हाच विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील खाडे यांच्या पुढाकारात किशोर खोब्रागडे, महेश काळे, श्याम काळे आदींनी तक्रारी नोंदविल्या. पंचनामे तात्काळ करण्याची मागणी त्यांनी केली. तालुक्यातील अनेक गावात बियाणे वांझ निघाल्याचे सांगितले जाते.
कर्मचाºयांच्या तुटवड्याने अडचणी येत आहेत. शेतात जावून पंचनामे त्वरित व्हावे, हा प्रयत्न आहे. १२२ गावांसाठी केवळ १८ कृषी सहायक आहेत. तरीही अधिकाधिक प्रकरणे निकाली काढली जाईल.
- नामदेव कुमरे,
तालुका कृषी अधिकारी, नेर