एसीबी ट्रॅपमध्ये शिक्षेचे प्रमाण नगण्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 08:18 PM2018-12-27T20:18:26+5:302018-12-27T20:18:47+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरून एसीबीच्या दोषसिद्धीचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकल्यानंतर शिक्षा हमखास होते, असा समज सर्वश्रृत आहे. मात्र आता या समजाला छेद बसला असून यवतमाळ एसीबीने दाखल केलेल्या प्रकरणात वर्षभरात केवळ एका गुन्ह्यात दोषसिद्ध झाला तर तीन आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. यावरून एसीबीच्या दोषसिद्धीचे प्रमाण नगण्य असल्याचे स्पष्ट होते.
एसीबीच्या सापळा कारवाईत अनेक तांत्रिक बाबींचा वापर केला जातो. पूर्वी पंच न्यायालयात होस्टाईल (फितूर) होत असल्याने आता प्रत्येक कारवाईदरम्यान शासकीय कर्मचाऱ्यांनाच पंच म्हणून ठेवण्यात येते. याचा फायदा सुरुवातीला मिळाला. दोषसिद्धीचे प्रमाण वाढले. मात्र आता पुन्हा उतरतीकळा लागली आहे. ट्रॅप झाल्यानंतर एसीबीकडून दोषारोपपत्र सादर करण्यासाठी आरोपी लोकसेवकाच्या सक्षम अधिकाºयाकडे परवानगी मागितली जाते. ही परवानगी मिळताच न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाते. ही प्रकरणे अनेक दिवस रेंगाळत असल्याने साक्ष-पुराव्याच्या वेळी फिर्यादीच्या बयानात बरीच तफावत राहते. याचा फायदा बचाव पक्षाचे वकील घेतात. तसेच दोषारोपपत्रातही उणिवा राहत असल्याने सरळ लाभ आरोपीला मिळतो. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून एसीबीच्या प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
गुन्हेसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने निर्देश दिले जातात. मात्र वर्षभरातील ट्रॅपची संख्या व आरोपी हीच आपली कामगिरी समजून गुन्हे सिद्ध करण्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. लाच घेणे किंंवा लाचेची मागणी करणे यावरूनही गुन्हा दाखल होतो. तत्काळ तपासही केला जातो. पुढे मात्र त्याचा योग्य पाठपुरावा होत नसल्याने बहुतांश प्रकरणात आरोपींना न्यायालयात फायदा मिळत आहे.
सापळ्यासाठी तांत्रिक साधनानंतरही अपयश
एसीबीकडून सापळा रचताना तांत्रिक साधनांचाही वापर केला जातो. प्रामुख्याने लाचेची मागणी किंवा स्वीकारताना होत असल्याच्या प्रकरणांमध्ये फिर्यादीला कॉल रेकॉर्ड करणे, व्हीडीओ चित्रीकरणाचीही सुविधा उपलब्ध आहे. त्यानंतरही दोषसिद्धी मात्र कमी आहे.