शासकीय ज्वारी केंद्रावर १३७३ क्विंटलचीच खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 06:53 PM2024-07-12T18:53:03+5:302024-07-12T18:53:28+5:30
Yavatmal : मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : येथे शासकीय ज्वारी खरेदीत शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीस फक्त ८९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी फक्त ४८ शेतकऱ्यांनी आपली ज्वारी शासकीय खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणली. एकूण १,३७३ क्विंटल ज्वारी जून महिन्यात खरेदी करण्यात आली.
ज्वारी खरेदी केंद्र जुलै महिन्यात सुरू राहणार असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून या केंद्रावर ज्वारी विक्री करण्यास शेतकरी फिरकलेले नाही. राळेगाव तालुक्यातील काही सहकार नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शासनाकडे शासकीय ज्वारी खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी मे महिन्यात केली होती. जून महिन्यात मिळालेला अत्यल्प प्रतिसाद पाहता त्यांची मागणी अनावश्यक होती. शासकीय यंत्रणेस नाहक त्रस्त करण्याची होती अशी चर्चा होत आहे. तालुक्यात उन्हाळी ज्वारीचा पेरा केवळ शंभर हेक्टर होता. बहुतांश शेतकऱ्यांनी पिकलेली ज्वारी २००० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल दराने आधीच विक्री केली होती. व्यापाऱ्यांची ज्वारी शेतकऱ्यांच्या सातबारावर, पीकपेऱ्यावर लावण्याचे प्रयत्न शासनाच्या कडक अटीमुळे शक्य झाले नाही.
शेतकऱ्यांचा माल निघून बाजारात आल्यावर त्यांना भाव मिळत नाही. प्रत्येकच हंगामात शेतकऱ्यांना या अडचणीला सामोरे जावे लागते. मिळेल त्या भावात शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.