वणीत धान्य खरेदीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 11:48 PM2018-10-19T23:48:23+5:302018-10-19T23:48:58+5:30
बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बाजार समितीच्या यार्डाच्या बाहेर अवैधपणे धान्य खरेदी करणाऱ्या तीन प्रतिष्ठानावर बाजार समितीने धाडी टाकून सात लाख रूपयांचे धान्य जप्त केले. शुक्रवारी दुपारी बाजार समितीच्या पथकाने ही कारवाई केली.
सध्या सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांच्या हाती आल्याने बाजारपेठेत सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. कृषी पणन नियमानुसार शेतकºयांना आपला माल बाजार समितीच्यामार्फतच विकावा लागतो. बाजार समितीला व शासनाला त्यामधून सेस प्राप्त होतो. मात्र मागील आठवड्यापासून शहरात विविध ठिकाणी बाजार समितीला डावलून काही व्यापारी अवैधपणे धान्य खरेदी करीत आहे. ही माहिती बाजार समितीला मिळाल्यावरून बाजार समितीच्या पथकाने शहरातील काही प्रतिष्ठानांवर धाड टाकली. त्यामध्ये अवैधपणे धान्य खरेदी करताना आढळल्याने बाजार समितीने नियमानुसार कारवाई केली. पहिली धाड लालगुडा परिसरातील रामदेव ट्रेडर्सवर टाकण्यात आली. तेथे अवैधपणे खरेदी केलेले ५० लाख रूपयांचे एक हजार ५०० क्विंटल सोयाबीन पथकाच्या हाती लागले. त्यानंतर आंबेडकर चौकामधील राजू निंबाळकर यांच्या दुकानातून ३० क्विंटल सोयाबीन व तीन क्विंटल तूर पथकाला मिळाली, तर नांदेपेरा मार्गावरील एका मंगल कार्यालयासमोर असलेल्या प्रतिष्ठानात १७ क्विंटल सोयाबीन दुकानाच्या बाहेर ठेवलेले आढळून आले. दुकानदाराला धाडीची कुणकुण लागताच त्याने दुकानातील शटर बंद करून तेथून पोबारा केला. वृत्त लिहीपर्यंत धान्य जप्तीची कारवाई सुरूच होती. भरारी पथकांमध्ये सचिव अशोक झाडे, रमेश पुरी, अशोक घुगुल, कैलास कारगीरवार, सुनील निमजे, परशुराम अहीरकर, आरिफ खान, मनोज वैद्य यांचा समावेश होता. या तिनही व्यापाऱ्यांना बाजार समितीच्या नोटीस देऊन सेस, बाजार फी व दंड भरण्यास सांगण्यात येणार आहे. तो न भरल्यास पुढील कारवाई करण्यात येईल, असे सचिव अशोक झाडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी माल बाजार समितीतर्फेच विकावा - संतोष कुचनकार
शेतकऱ्यांनी आपला शेतमाल अवैधपणे कोणत्याही व्यापाºयाला न विकता तो बाजार समितीतर्फेच विकावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकार यांनी शेतकºयांना केले आहे. पुढे शासनाने कोणत्याही दिलेल्या योजनेपासून शेतकरी वंचित राहू शकतो. त्यामुळे शेतकºयांनी स्वत:चे नुकसान करून घेऊ नये, असेही त्यांनी सांगितले.