समृद्धी महामार्गावर जळालेल्या ट्रॅव्हल्सची पीयूसी काढणे भोवले; पीयूसी केंद्राचा परवाना रद्द
By सुरेंद्र राऊत | Published: July 5, 2023 05:57 PM2023-07-05T17:57:38+5:302023-07-05T17:58:54+5:30
विम्याचा लाभ मिळणार नाही याची भीती
यवतमाळ : राज्य समृद्धी महामार्गावरयवतमाळातील विदर्भ ट्रॅव्हल्सला १ जुलैच्या रात्री अपघात झाला. यात २५ जणांचा जळून कोळसा झाला. या ट्रॅव्हल्सची पीयूसी मुदत मार्च महिन्यात संपली होती. अपघाताच्या घटनेनंतर सर्वांगीण चौकशी सुरू झाली. मात्र, त्यात चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. अशात पीयूसी नसल्याने विम्याचा लाभ मिळणार नाही, अशी भीती वाटली यातून जळालेल्या ट्रॅव्हल्सची चक्क १ जुलै रोजीच पीयूसी काढण्यात आली. हा प्रकार माध्यमातून पुढे आल्यानंतर यवतमाळ आरटीओंनी याची चौकशी सुरू केली. पीयूसी देणाऱ्या केंद्राचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
ट्रॅव्हल्स अपघाताच्या भीषण घटनेनंतर सर्वांनाच धक्का बसला. ट्रॅव्हल्स प्रवासाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यवतमाळ शहरातून मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्सचा व्यवसाय केला जातो. या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी गुंतवणूक आहे. आरटीओ व पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या ट्रॅव्हल्स रस्त्यावर उतरविल्या आहेत. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात यवतमाळच्या चिंतामणी ट्रॅव्हल्सला अपघात झाला. त्यात १२ जणांचा जळून मृत्यू झाला होता.
या ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते. त्यानंतर स्थानिक आरटीओंच्या गलथान कारभाराची लक्तरे पुढे आली. येथील भरारी पथकातील निरीक्षकांनी ट्रॅव्हल्सची तपासणीच केली नसल्याचे पुढे आले. स्वत: व्यवसायात असल्याने ट्रॅव्हल्सविरोधात कारवाई केली जात नाही. आता समृद्धीवर २५ जणांचा बळी घेणारी ट्रॅव्हल्स ही पोलिस उपनिरीक्षकांच्या पत्नीच्या नावाने आहे. या ट्रॅव्हल्सची सर्व कागदपत्रे अद्ययावत आहेत. केवळ पीयूसीची मुदत संपलेली होती. ती नसल्याने आरोप होऊ नये, विम्याचा लाभ मिळताना अडचणी येऊ नये, या भीतीतून थेट जळालेल्या ट्रॅव्हल्सची अपघात झाल्यानंतर पीयूसी काढण्यात आली. यावरून ऑनलाइन पीयूसीचे वास्तवच उघड झाले.
यवतमाळ आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या रॉयल पीयूसी सेंटरमधून जळालेली ट्रॅव्हल्स (एमएच २९ बीई १८१९)ची ऑनलाइन पीयूसी देण्यात आली. ही पीयूसी देणाऱ्या मिंटो उर्फ साकीब असलम याच्यावर आरटीओंनी कारवाई केली. त्याचा परवाना कायमचा रद्द केला. तर ट्रॅव्हल्स मालक प्रगती भास्कर दरणे यांना जबाबासाठी बोलावले. प्रगती दरणे यांच्या वतीने त्याचे पती भास्कर दरणे यांनी लेखी जबाब दिला. त्यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून काेणीतरी खाेडसाळपणा करत परस्पर पीयूसी काढल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.
वाहन नसताना पीयूसी देणाऱ्या रॉयल पीयूसी केंद्राचा परवाना रद्द केला आहे. सोबतच ट्रॅव्हल्स मालकाच्या वतीने भास्कर दरणे यांचा जबाब नोंदविला आहे. त्याचा अहवाल परिवहन आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. इतरही पीयूसी केंद्राची तपासणी केली जाणार आहे. वाहन नसताना पीयूसी देणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल.
- ज्ञानेश्वर हिरडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ