११00 गावांवर साथीचे सावट
By admin | Published: June 8, 2014 12:09 AM2014-06-08T00:09:26+5:302014-06-08T00:09:26+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमूने घेतले. प्रयोगशाळेतून तपासणी केली. यात एक हजार शंभर गावातील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेने उपाययोजना करण्याचे
दूषित पाणी : ग्रामपंचायतींनी मान्सूनपूर्व उपाययोजना टाळल्या
यवतमाळ : प्राथमिक आरोग्य केंद्राने पाणी नमूने घेतले. प्रयोगशाळेतून तपासणी केली. यात एक हजार शंभर गावातील पाणी दूषित असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित गावच्या ग्रामपंचायतींना आरोग्य यंत्रणेने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. परंतु नागरिकांच्या आरोग्याप्रती नेहमीच उदासीन असणार्या ग्रामपंचायतींनी आदेश धुडकावले. आता या गावातील हजारो नागरिकांना साथरोगाचा धोका आहे. तसा इशारा आरोग्य यंत्रणेने दिला आहे.
जिल्ह्यातील दोन हजार ४0 गावांमध्ये सात हजार पाण्याचे स्रोत आहे. या पानवठय़ांचे मान्सूनपूर्व निरीक्षण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राने पाण्याचे नमूने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविले. याचा अहवाल आरोग्य विभागाला नुकताच प्राप्त झाला. यानुसार एक हजार शंभर गावांमधील पाणी अधिक दूषित आहे.
दूषित पाण्याचा धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीला पत्र देण्यात आले. सर्वाधिक धोकादायक, मध्यम आणि दूषित अशी पाण्याची परिणामकारकता ठरविण्यात आली. त्यासाठी विशिष्ट रंगाचा वापर करण्यात आला. हिरवे कार्ड, पिवळे कार्ड आणि लाल कार्ड अशा तीन प्रकारात परिणामकारकता ठरविली. यानुसार सर्वाधिक धोकादायक असलेल्या ३७ ग्रामपंचायतीला रेड कार्ड देण्यात आले. मध्यम स्वरूपाचे पाणी असलेल्या ६२२ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड तर, दूषित पाणी असलेल्या ५४३ ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले.
तिनही प्रकारात विभागणी केलेल्या कार्डमध्ये पाणीपुरवठा दूषित असल्याचे नमूद आहे. याठिकाणी पावसाळ्यात हमखास साथरोग पसरण्याचा धोका आहे. सदर गावांमध्ये साथरोग पसरून स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने तत्काळ पावले उचलण्याचे आदेश आरोग्य यंत्रणेने दिले आहे. मात्र ग्रामपंचायती हा विषय गांभीर्याने घेण्यास तयार नाही. यातून या गावांमध्ये साथरोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
(शहर वार्ताहर)