पूस नदी झाली कचराकुंडी
By admin | Published: May 6, 2017 12:15 AM2017-05-06T00:15:43+5:302017-05-06T00:15:43+5:30
कधीकाळी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूस नदीचे स्वरूप आज अत्यंत विदारक झाले आहे.
घाणीचे साम्राज्य : शहरातील संपूर्ण गटाराचे पाणी नदीपात्रात
तालुका प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : कधीकाळी शहराची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूस नदीचे स्वरूप आज अत्यंत विदारक झाले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले असून शहरातील संपूर्ण गटाराचे पाणी नदी पात्रातच सोडले जाते. तसेच केरकचरा टाकून अनेकजण नदीतिरावर प्रात:विधी उरकतात. परिणामी पूस नदीला मोठ्या कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून पूस नदीच्या अस्तित्वासाठी कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही.
वाशिम जिल्ह्यातील काटेपुर्णा डोंगरदऱ्यात पूस नदीचा उगम झाला आहे. ६० किलोमीटरचा प्रवास करून पूस नदी पुसद तालुक्यात प्रवेश करते. शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर वनवार्ला गावाजवळ पूस धरण बांधले आहे. ही नदी शहरातून चार किलोमीटरचा प्रवास करते. मात्र या नदीचे शहरातील स्वरूप अत्यंत विदारक झाले आहे. पूर्वी नदी बारमाही वाहात होती. जलस्तर उंचावल्याने नदी पात्रातून निर्मळ पाणी वाहायचे. मात्र सद्यस्थितीत पुसदमधून वाहणाऱ्या नदीत लगतच्या वसाहतीमधील अनेक गटारांचे पाणी सोडले जाते. नदी काठावरील वसाहती, झोपडपट्ट्यातील घाण गटारांद्वारे थेट नदी पात्रात टाकली जाते. हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पावसाळ्यात काही प्रमाणात नदीचे घाण पाणी वाहून जाते. उर्वरित काळात मात्र नदीला कचराकुंडीचे स्वरूप आलेले असते. नदीच्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी आली असून पुलावरून जाताना त्याची जाणीव होते. १४ वर्षांपूर्वी पुसद नगरपरिषदेने पूस नदीपात्र स्वच्छतेचे काम हाती घेतले होते. दहा लाखांपेक्षा अधिक खर्च करण्यात आला होता. त्यानंतर मात्र कधीही सफाई अभियान राबविण्यात आले नाही. दोन वर्षांपूर्वी पुसदच्या निसर्ग संवाद संस्थेने पूस नदी स्वच्छतेसाठी निवेदन दिले होते. मात्र त्यांची आश्वासनावरच बोळवण करण्यात आली. प्रत्यक्षात अद्याप कोणतेही काम हाती घेतले नाही. पूस नदीच्या या विदारक रूपाची अनेकांना चिंता वाटते परंतु पुढाकार मात्र कुणीही घेत नाही. पुसद शहरातून वाहणाऱ्या पूस नदीचे पात्र घाणीच्या विळख्यात सापडले आहे.
पूस नदीची स्वच्छता येत्या २० मेपासून सुरू होणार आहे. नगरपरिषदेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या गटाराचे पाणी, कचरा यावर भूमिगत गटार योजना राबविण्याचा मानस आहे. तसेच कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यावर ३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर भूमिगत गटार योजनेसाठी २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दोनही योजनांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अॅड. भारत जाधव, आरोग्य सभापती, नगरपरिषद पुसद
पूस नदीची गटारगंगा झाली आहे. नदीत सोडण्यात येत असलेल्या गटारातील पाणी, घाण यावर प्रक्रिया करून नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी काम हाती घेणे गरजेचे आहे. पूस नदीच्या पात्रात असलेल्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याची दुरावस्था झाली आहे. तो पुतळाही इतरत्र हलविला पाहिजे. पूस नदी स्वच्छ होणे गरजेचे आहे.
- निखिल चिद्दरवार, विरोधी पक्ष, गटनेते, पुसद नगरपरिषद