पूसद आगाराच्या बसने घेतला अचानक पेट
By विलास गावंडे | Published: May 1, 2023 06:42 PM2023-05-01T18:42:01+5:302023-05-01T18:42:11+5:30
नेर येथे सोमवारी अचानक बसने पेट घेतला.
नेर (यवतमाळ) : राज्य परिवहन महामंडळात दिवसागणिक खराब बसेस वाढत आहे. यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडतात. नेर येथे सोमवारी अचानक बसने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून ही आग विझवली. या बसमध्ये ५८ प्रवासी होते. या गोंधळात एका महिलेचा मोबाईल चोरी गेला.
पुसद आगाराची बस क्रंमाक एम एच ०७ सी ९४३८ पुसद वरून तेल्हारा जाण्यासाठी चालक नामदेव साखरे व वाहक उमेश वडते ५८ प्रवाशी घेऊन निघाले. नेर आगाराबाहेर बस निघताच बॅटरी शॉर्ट झाल्याने धूर निघाला. बस थोडी समोर जाताच स्थानिक पूर्णिमा लाँज समोर एसटीच्या पायरीखालून पेट घेतला. या घटनेनंतर चालकाने ही बस थांबवली व प्रवाशी लगेच खाली उतरले.
नागरिकांनी व चालक-वाहकांनी पाणी टाकून ही आग विझवली. दरम्यान, या गोंधळामुळे एका महिलेचा मोबाईल चोरी गेला. चालक नामदेव साखरे यांनी एसटी बसमधील बँटरी शार्ट झाल्याने आग लागल्याचे सांगितले. या घटनेमुळे परीसरात पूर्ण गोंधळ उडाला. घटना बघण्यासाठी नागरीकांनीही गर्दी केली होती.