पुसद तालुक्यात सहा हजार ५४५ नागरिकांनी केली कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:54+5:302021-05-25T04:46:54+5:30
पुसद : प्रारंभापासून तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट राहिला. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाची दहशत निर्माण झाली. मात्र, आता दिलासादायक बातमी पुढे ...
पुसद : प्रारंभापासून तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट राहिला. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाची दहशत निर्माण झाली. मात्र, आता दिलासादायक बातमी पुढे आली. तालुक्यातील सहा हजार ७९३ कोरोनाबाधितांपैकी तब्बल सहा हजार ५७८ नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.
तालुक्याचा पॉझिटिव्हिटी रेट १०० रुग्णांमागे १९ टक्के होता. हा दरही आता घसरून सात टक्क्यांवर आला आहे. तालुक्यात आतापर्यंत ९० नागरिक कोरोनाचे बळी ठरले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा रुग्ण वाढीचा दर जास्त राहिला. मागील दोन महिन्यांत कोरोना तालुक्याच्या गावागावांत पोहोचला. तालुक्यात सध्या १२५ नागरिक पॉझिटिव्ह असून त्यात शहरात ४८, तर ग्रामीण भागातील ७७ नागरिकांचा समावेश आहे. तालुक्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण सहा हजार ७९३ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यात शहरात तीन हजार ५१९, तर ग्रामीण भागातील तीन हजार २७४ नागरिकांचा समावेश आहे.
चार हजार ३३८ जणांची आरटीपीसीआर, तर दोन हजार ४५५ नागरिकांची रॅपिड चाचणी करण्यात आली. त्यात शहरी भागातील तीन हजार ४१३, तर ग्रामीण भागातील तीन हजार १६५ नागरिक पॉझिटिव्ह आले होते. तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण १४ मे २०२० रोजी हुडी (बु.) येथे आढळून आला होता. कोरोनाचा पहिला बळी जून २०२० मध्ये नोंदविला गेला. शहरातील एका ६५ वर्षीय ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांचा कोरोनाने बळी घेतला होता. तालुक्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ९० नागरिकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यात शहरातील ५८, तर ग्रामीण भागातील ३२ नागरिकांचा समावेश आहे. तूर्तास कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून ही दिलासादायक बाब आहे.
बॉक्स
तालुक्यात ३० हजार नागरिकांचे लसीकरण
लसीकरणाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली आहे. १६ जानेवारीपासून आतापर्यंत तालुक्यात ३० हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी दिली. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी गावागावांत कोरोना चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे कोरोना नियंत्रणात यश आले आहे. शहरात संचारबंदीमुळे दिवसभर नागरिक बाहेर फारसे फिरत नाहीत; परंतु ग्रामीण भागात लग्न, नवस आदी कार्यक्रमांमुळे मोठी गर्दी पाहायला मिळते. शहरांपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे प्रमाण अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोट
गावपातळीवर लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ४७ उपकेंद्रांच्या माध्यमातून १७० गावांचे नियोजन करण्यात आले आहे.
डॉ. आशिष पवार,
तालुका आरोग्य अधिकारी, पुसद.