पुसद तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:41 PM2018-03-07T23:41:35+5:302018-03-07T23:41:35+5:30
तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तथापि तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही शेततळ्याच्या प्रतीक्षेत आहे.
ऑनलाईन लोकमत
पुसद : तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून केला जात आहे. तथापि तालुक्यातील अनेक शेतकरी अद्यापही शेततळ्याच्या प्रतीक्षेत आहे.
मागेल त्याला शेततळे या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेततळे खोदण्यासाठी अनुदान दिले जाते. यातून शेतकऱ्यांना शास्वत सिंचनाची सुविधा प्राप्त होते. त्यांना दुबार पीक घेणेही शक्य होते. खरीप आणि रबी हंगामात पीक घेऊन शेतकऱ्यांना आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ करता येते. हीच बाब हेरुन शासनाने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत तालुक्यात ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभाग करीत आहे. २०१७-१८ साठी पुसद तालुक्याला जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शेततळ्यांसाठी दोन कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला.
तालुक्यातील ६३ गावांमध्ये ८५० शेततळे पूर्ण झाले. मात्र अनेक गावांमध्ये कागदोपत्री शेततळे पूर्ण करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. दर १५ दिवसांनी कृषी विभाग आॅनलाईन मागणीनुसार शेततळ्यांसाठी लाभार्थ्यांची निवड करते. अंदाजपत्रक तयार करून उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जाते. काम पूर्ण झाल्यावर अनुदान दिले जाते. मात्र ज्या शेतकऱ्याच्या नावावर केवळ ०.६० हेक्टर जमीन आहेत. त्यांनाच योजनेचा लाभ दिला जातो. यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्य दिले जाते. ५० हजारांच्या अनुदानातून हे शेततळे पूर्ण करावे लागते.
जलयुक्तशिवार अभियानांतर्गत तालुक्यात २०१७-१८ मध्ये खैरखेडा येथे सर्वाधिक ४८ शेततळे मंजूर झाले आहे. तथापि अनेक गावांमध्ये कागदोपत्रीच शेततळे पूर्ण झाल्याची ओरड सुरू आहे.
अनुदान कमी असल्याची ओरड
एक शेततळे पूर्ण करण्यासाठी किमान लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र शासनाकडून केवळ ५० हजारांचे अनुदान दिले जाते. त्यामुळे अनुदान कमी असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे. कृषी विभाग मात्र एवढ्याच अनुदानात शेततळे पूर्ण होत असल्याचा दावा करीत आहे. दरम्यान उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रकाश नाईक, तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी ८५० शेततळे पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.