पुसद बनले बनावट दारू निर्मितीचे मुख्य केंद्र

By admin | Published: February 26, 2015 02:07 AM2015-02-26T02:07:00+5:302015-02-26T02:07:00+5:30

वापर झालेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या स्वच्छ करून आणि त्यावर ब्राँडेड कंपन्यांचे लेबल व अवघ्या पाच रूपयात बाजारात मिळणारे सील लावून बनावट दारूची तस्करी केली जात आहे.

Pusadal became the main center of the manufacture of fake liquor | पुसद बनले बनावट दारू निर्मितीचे मुख्य केंद्र

पुसद बनले बनावट दारू निर्मितीचे मुख्य केंद्र

Next

यवतमाळ : वापर झालेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या स्वच्छ करून आणि त्यावर ब्राँडेड कंपन्यांचे लेबल व अवघ्या पाच रूपयात बाजारात मिळणारे सील लावून बनावट दारूची तस्करी केली जात आहे. पुसद या बनावट दारूचे मुख्य केंद्र बनले असून यवतमाळच नव्हेतर लगतच्या नांदेड, वाशिम, दारूबंदी असलेल्या वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात बनावट दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे. या गंभीर प्रकाराकडे उत्पादन शुल्कचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष आहे.
साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत ईथेनॉल आणि स्पिरीटसारखे टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात. काही वर्षांपासून या ईथेनॉल आणि स्पिरीटवर प्रक्रिया करून औषध, इंधन व मद्य निर्मितीत त्याचा वापर व्हायला लागला आहे. त्यामुळे साखर उद्योगाला जोडधंदा मिळाला आहे. ही बाब स्वागतार्ह असली तरी कुत्सीत बुध्दीच्या काही व्यावसायिकांनी त्याचा वापर बनावट दारू तयार करण्यासाठी चालविला आहे. ईथेनॉल आणि स्पिरीटमध्ये रंग, साखर आणि ईसेन्स मिसळून विदेशी तर रंग न टाकता देशी दारू तयार केली जात आहे. २० ते २५ प्रती लिटरप्रमाणे ईथेनॉल खरेदी करायचे. रंग, साखर आणि ईसेन्स घालून बनावट विदेशी दारू प्रतीलिटर ३५ ते ४० रूपयादरम्यान पडते. साधारणत: १० रूपयात २५० मिली बनावट दारू तयार होते. ती १८० मिलीच्या बाटलीत १०० ते १२५ प्रती बाटली मर्जीतील आणि साखळीतील अवैध दारू व्यावसायिकांना घाऊक प्रमाणात म्हणजेच मेटॅडोअर, ट्रक भरेल अशा पध्दतीने विकली जाते. त्यातून दारू माफिया महिन्याकाठी लाखो रूपये कमावत आहे.
पुसद या बनावट दारूचे मुख्य केंद्र बनले आहे. गेल्या सात वर्षांपासून पुसद येथे हा गोरखधंदा बिनबोभाट सुरू आहे. गेल्या तीन वर्षात येथील उत्पादन शुल्क विभागाने तेथे धाडी घालून पाचवेळा बनावट दारूचे अड्डे पकडले. एका ठिकाणी तर ट्रकभरेल एवढे सील (बाटल्यांचे झाकण) जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आर्थिक घडमोडी होवून पुन्हा हे अड्डे सुरू झालेत. ते आजतागायत अव्याहत सुरू आहेत. आता तर उत्पादन शुल्क विभागही लक्ष द्यायला तयार
नसल्याने दारू माफीयांचे चांगलेच फावत आहे.
सुरूवातीला चोरट्या मार्गाने पुसद लगतच्या नांदेड व वाशीम जिल्ह्यात या बनावट दारूचे पाट वहात होते. आता दारू माफियांनी या धंद्याची पाळेमुळे चांगलीच रोवली आहे. पूर्वापार दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात वडकी मार्गे या बनावट दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे.
चंद्रपूर जिल्हाही दारूबंदीच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे धंद्याच्या कडा विस्तारीत तेथेही बनावट दारू विक्रीचे नेटवर्क उभे केले जात आहे. घाटंजी तालुक्यातील पारवा मार्गे ही दारू चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी होत आहे. ही दारू प्यायल्याने नागरीकांच्या आरोग्याचेच नव्हेतर शासनाच्या महसूलाचेही महिन्याकाठी लाखोंचे नुकसात होत आहे. मात्र ही तस्करी व गोरखधंदा रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून कुठलीही पाऊले उचलली जात नसल्याचे दिसून येत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Pusadal became the main center of the manufacture of fake liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.