पुसद एसडीओंची बाभूळगाव रेती घाटावर मध्यरात्री धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:54 PM2018-05-17T21:54:21+5:302018-05-17T21:54:21+5:30
यवतमाळचे एसडीओ व बाभूळगावच्या तहसीलदारांना भनकही लागू न देता पुसदच्या एसडीओंनी वाटखेड रेती घाटावर मध्यरात्री भली मोठी धाड यशस्वी केली. त्यात ३७ वाहने व रेती जप्त करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ /बाभूळगाव : यवतमाळचे एसडीओ व बाभूळगावच्या तहसीलदारांना भनकही लागू न देता पुसदच्या एसडीओंनी वाटखेड रेती घाटावर मध्यरात्री भली मोठी धाड यशस्वी केली. त्यात ३७ वाहने व रेती जप्त करण्यात आली. मोजणीनंतर संंबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.
प्रशिक्षणाहून परतलेले जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशावरुनच ही आंतर उपविभागीय कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने यवतमाळचे एसडीओ व बाभूळगाव तहसीलदारांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. धाडीची खबर मिळाल्यानंतर बाभूळगाव तहसीलदार पहाटे ४ वाजता घटनास्थळी पोहोचल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी ‘लोकमत’ला दिली.
बाभूळगाव तालुक्यातील वाटखेड-१ व वाटखेड - २ येथील रेती घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत असल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाली. त्यावरून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुसदचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांना याठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून बुधवारी सायंकाळी पुसदचे एसडीओ नितीनकुमार हिंगोले, नायब तहसीलदार ढबाले, तलाठी कामराज चौधरी यांनी धाड मारली. रेती घाटाचे प्रतिनिधीही यावेळी रेती घाटावर नसल्याचे पुढे आले. या पथकाने ३७ वाहने जप्त केली.
त्यात तीन बोट, चार ट्रेझर बोटी, दोन सक्शन पंप, एक जेसीबी, पोकलॅन्ड आणि ट्रक यांचा समावेश आहे.
ही सर्व वाहने बाभूळगाव पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. कारवाई गुरुवारी सकाळी बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे, नायब तहसीलदार डी.पी. बदकी व पोलीस यंत्रणेने दिवसभर रेती घाटाचे मोजमाप केले. वृत्तलिहिपर्यंत कारवाई सुरू होती. मोजमाप झाल्यानंतर संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहे.
बाभूळगाव प्रमाणे इतर रेती घाटावरही महसूल विभागाला थेट कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. रेती माफियांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. राजेश देशमुख
जिल्हाधिकारी, यवतमाळ.