पुसदच्या प्रेषित रुद्रवारची मास्कोत उत्तुंग भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:42 AM2021-04-16T04:42:13+5:302021-04-16T04:42:13+5:30
प्रसिद्ध अभिनेते व सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे अभिनित व दिग्दर्शित ‘काळोखाच्या पारंब्या’ या मराठी चित्रपटाचे मास्को येथे होणाऱ्या ...
प्रसिद्ध अभिनेते व सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे अभिनित व दिग्दर्शित ‘काळोखाच्या पारंब्या’ या मराठी चित्रपटाचे मास्को येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नामांकन झाले आहे. मकरंद देशपांडे यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. यात वैभव काळे, काजल राऊत, राजा सोनवणे यांच्यासह पुसदचे सुपुत्र प्रेषित रुद्रवार व पुरुषोत्तम चांदेकर यांच्या भूमिका आहेत.
प्रथितयश कथालेखक भारत सासणे यांच्या ‘डफ’ या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. यापूर्वी पुणे येथील चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट स्पर्धेसाठी या चित्रपटाची निवड झाली आहे. प्रेषित रुद्रवारने यापूर्वी हैद्राबाद मुक्ती संग्रामावर आधारित ‘रझाकार’ या चित्रपटात भूमिका केली आहे. प्रा.डॉ. कमलेश महाजन लिखित ‘चकवा चांदण’ या व्यावसायिक नाटकातही भूमिका केली आहे. ‘माय’ या वृत्तवाहिनीच्या औरंगाबाद केंद्रावर कार्यक्रम प्रमुख तथा निवेदक म्हणून प्रेषित कार्यरत आहे. येथील महिला महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. उत्तम रुद्रवार यांचा तो मुलगा आहे. ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषितला लाभलेल्या संधीबद्दल त्याचे कौतुक होत आहे.