पुसदचे डॉक्टर निकृष्ट रस्त्याविरोधात रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:14 PM2018-11-29T22:14:02+5:302018-11-29T22:14:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : पुसदच्या डॉक्टर लेनला जोडणाºया सुमारे एक किलोमीटर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात डॉक्टर मंडळी रस्त्यावर उतरली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : पुसदच्या डॉक्टर लेनला जोडणाºया सुमारे एक किलोमीटर रस्त्याच्या निकृष्ट कामाविरोधात डॉक्टर मंडळी रस्त्यावर उतरली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी पुसद सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
पुसद नगरपरिषदेतील बांधकाम विभागाचा गोंधळ नेहमीच चर्चेत राहिला आहे. ‘टक्केवारी’च्या गणिताआड बांधकामाच्या गुणवत्तेला नेहमीच मूठमाती दिली गेली आहे. पुसद शहरातील शिवाजी चौक ते मुखरे चौक या एक कोटींच्या रस्त्याचे बांधकाम दोन महिन्यांपूर्वी सुरू झाले. नगरपरिषदेच्या या कामाला यवतमाळच्या बांधकाम अधीक्षक अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली. जुना पाच मीटरचा रस्ता रूंदीकरण करून साडेसात मीटर करण्याचा हा प्रस्ताव होता. हा संपूर्ण रस्ता डांबरी करायचा होता. या रस्त्यावर बहुतांश डॉक्टरांचे दवाखाने, न्यायालयाची इमारत आहे. पुसदच्या बी.के. कंस्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाले. परंतु सुरुवातीपासूनच या कामाच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. रस्त्याच्या दोनही बाजूने साईडपट्ट्यांचे खोदकाम करून तेथे नव्याने पक्के काम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात साधा कच्चा रस्ता (डब्ल्यूबीएम) करून त्यावरच पुढील काम करण्यात आले. वास्तविक तेथे वार्इंडींग करणे बंधनकारक होते. यासर्व कामाच्या गुणवत्तेबाबत संशय असल्याने त्या मार्गावरील डॉक्टरांनी खासगी एक्सपर्ट बोलावून रस्त्याची पाहणी तथा तपासणी केली. तेव्हा साईडपट्ट्यांचे कामच झाले नसल्याची गंभीर बाब निदर्शनास आली. नगरपरिषदेचे काम असल्याने या डॉक्टरांनी पालिकेच्या राजकीय प्रमुखांकडे धाव घेतली. मात्र तुम्ही भाजपाचे आहात, जाणीवपूर्वक आमच्याविरोधात तक्रारी करता, अशा शब्दात त्यांना सुनावले गेले. अखेर या डॉक्टरांनी नुकतीच यवतमाळात जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यावर जिल्हाधिकाºयांनी पुसदच्या सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंत्यांना कामाची तपासणी करून अहवाल मागितला आहे. नगरपरिषदेचे शाखा अभियंता व त्यांच्या अधिनस्त कनिष्ठावर हे प्रकरण शेकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष असे, या प्रकरणाचा पॉझिटीव्ह आणि तत्काळ अहवाल द्यावा म्हणून कार्यकारी अभियंत्याकडे नगरपरिषदेतून राजकीय मोर्चेबांधणीही सुरू झाल्याची माहिती आहे. गुरुवारी पालिकेच्या एका पदाधिकाºयाने त्यासाठी अभियंत्याची भेट घेऊन ‘माझ्यासाठी एवढे करा’ असे म्हणून साकडे घातल्याची माहिती आहे. एक कोटी रुपये बजेट असलेले हे काम दोन महिन्यांपासून सुरू झाले आहे. त्यापोटी सुमारे २५ ते ३० लाखांचे देयक देण्यातही आल्याचे बोलले जाते. या रस्त्याच्या अनुषंगाने नगरपरिषदेच्या अभियंत्यांनी नेमके काय रेकॉर्ड लिहिले, याची विचारणा केली असता संबंधितांनी ‘एमबी’ (मोजमाप पुस्तिका) रेकॉर्ड केली नसल्याचे चौकशी अधिकाºयाला सांगितले. रेकॉर्डच बनले नसेल तर २५ ते ३० लाखांचे पेमेंट केले कसे, हा मुद्दा उपस्थित होतो आहे.
‘एसर्इं’ना अंधारात ठेऊन परस्पर तांत्रिक बदल
नगरपरिषदेच्या एक कोटींच्या या रस्त्याला अधीक्षक अभियंत्यांनी तांत्रिक मान्यता दिली आहे. आता साईडपट्ट्या न खोदता बांधकाम का केले, या प्रश्नाच्या बचावार्थ नगरपरिषदेचे पदाधिकारी ‘तेथे हार्ड मुरूम होता, त्यामुळे गरज भासली नाही’ असा बचाव घेत आहेत. वास्तविक या बदलासाठी कंत्राटदार व पालिका अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांची पुन्हा तांत्रिक मंजूरी घेणे क्रमप्राप्त होते. मात्र तसे न करता परस्परच आपल्या सोयीने हे काम फिरविले गेले, हे विशेष. या बदलात पालिकेचे अभियंते अडचणीत येण्याची चिन्हे दिसू लागली आहे.