पुसदच्या खासगी हॉस्पिटलमध्ये शासननियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:38 AM2021-04-26T04:38:25+5:302021-04-26T04:38:25+5:30
येथील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सीटी स्कॅनचे बिल शासनादेशापेक्षाही दुप्पट घेण्यात येते. २४ सप्टेंबर २०२० च्या शासनादेशात सीटी स्कॅनचे ...
येथील मेडिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सीटी स्कॅनचे बिल शासनादेशापेक्षाही दुप्पट घेण्यात येते. २४ सप्टेंबर २०२० च्या शासनादेशात सीटी स्कॅनचे बिल दोन हजार रुपये घेण्यात यावे, असे नमूद आहे. मात्र, येथे प्रत्येक रुग्णाकडून चार हजारांची आकारणी केली जाते. रक्त तपासणी शुल्क इतर हॉस्पिटलपेक्षा १२०० ते १३०० रुपये जादा आहे. कोविड रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन चार हजार रुपये एवढे जादा लावण्यात येते. याचे पुरावे शरद मैंद यांनी यावेळी सादर केले.
हॉस्पिटलकडून गेल्या सहा महिन्यांत पुसद व उमरखेड उपविभागातील गरजू व असाहाय्य रुग्णांकडून जवळपास तीन कोटी रुपयांची आर्थिक लूट करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची शासनाच्या उच्च समितीकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. याबबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, त्याच्या प्रती मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, खासदार, आमदारांसह जिल्हा शल्यचिकित्सक, विभागीय आरोग्य उपसंचालक (अकोला) आदींना पाठविल्याचे त्यांनी सांगितले. येत्या तीन महिन्यांत हॉस्पिटलवर कारवाई करावी व हॉस्पिटल प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांत रुग्णांची सीटी स्कॅन, रक्त तपासणी व रेमडेसिविर इंजेक्शन आदींबाबत जादा शुल्क आकारून केलेल्या आर्थिक लुटीचे त्या-त्या रुग्णांना पैसे परत न केल्यास नागपूर उच्च न्यायालयात शासन व हॉस्पिटलविरुद्ध याचिका दाखल करण्याचा इशाराही शरद मैंद यांनी दिला.