पुसदच्या तरुणाचे दुचाकीने भारतभ्रमण; ३० दिवसांत १० राज्यातून १० हजार किमीचा प्रवास करणार
By रवींद्र चांदेकर | Published: June 14, 2023 04:29 PM2023-06-14T16:29:13+5:302023-06-14T16:31:42+5:30
संत सेवालाल महाराजांचा शांतीचा संदेश गावोगावी पोहोचविणार
पुसद (यवतमाळ) : तालुक्यातील शळोणा येथील एक युवक दुचाकीने भारतभ्रमण करणार आहे. तो ३० दिवसांमध्ये १० राज्यांतून तब्बल १० हजार किलोमीटरचा प्रवास करून संत सेवालाल महाराज यांचा शांती संदेश गावोगावी पोहोचविणार आहे.
दीपक मंगल आडे (३४) असे या युवकाचे नाव आहे. ‘हिंमत हैं मर्दा, तो मदद दे खुदा’, असे म्हटले जाते. त्यानुसार या ध्येयवेड्या दीपकने बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराज यांचा शांतीचा संदेश चोहीकडे पोहोचविण्याच्या हेतूने चक्क दुचाकीने भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. नुकताच ९ जूनला तो पुसद येथून अमरनाथकडे रवाना झाला. तो सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे. दीपक ३० दिवसांत १० राज्यातून तब्बल १० हजार किलोमीटरचा प्रवास स्वतःच्या दुचाकीने करणार आहे, हे विशेष.
तालुक्यातील शिळोणा या लहानशा खेड्यातील तो रहिवासी आहे. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे दैवत आहे. त्यांनी आपल्या हयातीत गावागावात, तांड्यातांड्यांवर जाऊन लोकांना शांती व सद्भावनेचा संदेश दिला होता. अखंड भारताचे स्वप्न बघितले होते. त्यांचा अखंड भारत व शांतीचा संदेश चोहीकडे पोहोचविण्याच्या उद्देशाने दीपक आडे दुचाकीने भारत भ्रमंतीवर निघाला आहे. तो मंडप डेकोरेशनचे काम करतो. मात्र, ध्येयाने पछाडलेला दीपक पांढरा ध्वज घेऊन स्वतःच्या दुचाकीने पुढील एक महिना भारतभ्रमण करणार आहे.
मेकॅनिककडून प्रेरणा, असा राहणार प्रवास
दीपक आडे पुसद येथून वाशिम, पातूर, शेगाव, मुक्ताईनगर, बुऱ्हाणपूर, ओंकारेश्वर, इंदोर, उज्जैन, निमच आदी मार्गाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केदारनाथ, बद्रीनाथ, अमरनाथ, राजस्थान, पंजाब, हरयाणा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिसा, बिहार आदी १० राज्यातून प्रवास करणार आहे. येथील बंजारा कॉलनीजवळील दुचाकी मेकॅनिक हिरा कान्हेड यांच्याकडून भारत भ्रमंतीचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्याचे दीपक आडे यांनी सांगितले. हिरा कान्हेड हे दरवर्षी निवडक मित्रांना घेऊन दुचाकीने पर्यटन करतात. दुचाकीने एकटा भारतभ्रमंती करणाऱ्या दीपक आडे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.