पूसचा कोल्हापुरी बंधारा कुचकामी
By admin | Published: May 4, 2017 12:32 AM2017-05-04T00:32:42+5:302017-05-04T00:32:42+5:30
शहरालगत वाहणाऱ्या पूस नदीवर बांधलेला कोल्हापुरी बंधारा कुचकामी ठरत असून उन्हाळ्यात या बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट आहे.
पाण्याचा ठणठणाट : महागाव सिंचन विभागाचे दुर्लक्ष
महागाव : शहरालगत वाहणाऱ्या पूस नदीवर बांधलेला कोल्हापुरी बंधारा कुचकामी ठरत असून उन्हाळ्यात या बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. १३ लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या बंधाऱ्याचा कोणालाही उपयोग होत नाही.
सध्या महागाव तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी आणि जलस्रोत वाढविण्यासाठी महागाव येथील कमळेश्वर संस्थाननजीक पूस नदीच्या पात्रात कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्याचे उद्घाटन आमदार राजेंद्र नजरधने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी नरवाडे, अनिल नरवाडे, नगरपरिषदेचे अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते. या कामावर १३ लाख रुपये खर्च करण्यात आले. परंतु पाणी थांबावे यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही. बंधाऱ्याला नवीन प्लेट लावणे गरजेचे होते. परंतु बंधाऱ्यात जुन्याच प्लेटचा उपयोग करण्यात आला. यामुळे संपूर्ण पाणी वाहून गेले.
कमळेश्वर पाणी वापर संस्थेचे काम होते त्या काळात या बंधाऱ्यात मोठा जलसाठा राहत होता. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होत होती. तसेच परिसरातील जलस्रोतातही मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध राहत होते. परंतु आता या बंधाऱ्यात पाण्याचा ठणठणाट झाला आहे. या प्रकरणाची तक्रार अनंता नागरजोगे यांनी केली आहे. शनिवारी मुख्यमंत्री डेहणी उपसा सिंचन प्रकल्पाला भेट देत आहे. त्यांनी या कोल्हापुरी बंधाऱ्याकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
जनावरांच्या पाण्याचा प्रश्न
पूस नदीवर बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्याचा उपयोग जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी केला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत होता. परंतु आता हा बंधारा कोरडा पडल्याने जनावरांना घेऊन पाण्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.