महामार्ग रद्द झाल्याने गुंतवणूकदारांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 09:56 PM2018-11-26T21:56:15+5:302018-11-26T21:56:33+5:30
राजेश निस्ताने । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : धारणी-करंजी हा ३१४ किलोमीटरचा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग नीती आयोगाने रद्द केल्याने ...
राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : धारणी-करंजी हा ३१४ किलोमीटरचा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग नीती आयोगाने रद्द केल्याने या मार्गावरील तमाम गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. महामार्गाच्या भूसंपादनात जमिनी जातील आणि शासनाकडून चार-पाच पट मोबदला मिळेल, असा या गुंतवणूकदारांचा मनसुबा होता. परंतु तो नीती आयोगाच्या नकारामुळे उधळला गेला.
अमरावती जिल्ह्यातील धारणी (मेळघाट) ते यवतमाळ जिल्ह्यातील करंजी असा मध्यप्रदेश ते आंध्रप्रदेशला जोडणारा राष्टष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यासाठी सर्वेक्षण, मोजणी व प्रस्तावांची प्रक्रिया सुरू होती. कुठे उड्डान पुल, कुठे बायपास, कुठे वळण, कुठे घाट समाप्ती याचा संपूर्ण अभ्यास करून सुमारे साडेतीन हजार कोटींचे बजेट असलेला हा रस्ता प्रस्तावित केला गेला होता. ही बाब डोळ्यापुढे ठेऊन अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर अन्य जिल्ह्यातील व राज्यातील गुंतवणूकदारांनी धारणी ते करंजी या मार्गावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात गेल्या तीन-चार वर्षात कमी दरात जमिनींची खरेदी केली होती. जेथून बायपास जाणार तेथेही जमिनी घेतल्या गेल्या. कमी दरात या जमिनी घेऊन शासनाला भूसंपादनाच्या नावाखाली जास्त दरात विकण्याचा गुंतवणूकदारांचा मनसुबा होता. त्यात नागपूर-बोरी-तुळजापूर व वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील काही गुंतवणूकदारांचाही समावेश आहे. परंतु नीती आयोगाने हा महामार्गच रद्द केल्याने या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे. कारण धारणी ते करंजी हा महामार्ग रुंदीकरण न करता आहे त्याच स्थितीत बांधला जाणार आहे. पर्यायाने भूसंपादनाचा प्रश्नच निर्माण होणार नाही. त्यामुळे आज तरी ही गुंतवणूक फसल्याचे मानले जात आहे. या मार्गाच्या भूसंपादनासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये लागणार होते. अर्थात यातील बहुतांश रक्कम जमिनीचा मोबदला म्हणून त्या गुंतवणूकदारांच्या घशात जाणार होती. मात्र या पाचशे कोटींमुळेच नीती आयोगाने महामार्गास नकार दिला. धारणी-करंजीच्या धर्तीवर वरुड-मोर्शी-तिवसा-धामणगाव-बाभूळगाव-यवतमाळ या महामार्गासाठी चाचपणी सुरू होती. परंतु आता त्यालाही आपसुकच ब्रेक लागला आहे.
दिल्लीत लॉबिंग
नीती आयोगाने भूसंपादनासाठी पाचशे कोटी परवडणारे नाही, तेवढा निधी नाही असे कारण पुढे करून धारणी ते करंजी हा राष्ट्रीय महामार्ग रोखला असला तरी तो व्हावा यासाठी यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची लॉबी सक्रिय झाली आहे. नागपूर-मुंबई-दिल्ली या मार्गाने हा राष्ट्रीय महामार्ग परत आणता येतो का या दृष्टीने या गुंतवणूकदारांच्या लॉबीचे राजकीयस्तरावरून ‘वजनदार’ प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.