पुसद शहर गेले खड्ड्यात, सर्वत्र घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:48 PM2019-05-09T23:48:07+5:302019-05-09T23:48:51+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आणि सत्ता असलेल्या पुसद नगरपरिषद क्षेत्रातील शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ‘स्वच्छ व सुंदर शहर’ हा नारा केवळ कागदावरच राहिला आहे. पुसद शहरातील रस्ते खड्ड्यात गेले, असा संतप्त सूर जनतेतून ऐकायला मिळतो आहे.
पुसद : राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आणि सत्ता असलेल्या पुसद नगरपरिषद क्षेत्रातील शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ‘स्वच्छ व सुंदर शहर’ हा नारा केवळ कागदावरच राहिला आहे. पुसद शहरातील रस्ते खड्ड्यात गेले, असा संतप्त सूर जनतेतून ऐकायला मिळतो आहे. शहराच्या मुख्य मार्गावरच ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचल्याने शहराला बकाल अवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कचºयाचे हे ढीग पाहता नगरपरिषद कचरा व्यवस्थापनावर लाखो रुपयांचा खर्च नेमका कुठे करते, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होतो. नगरपरिषदेमध्ये अधिकारी-कर्मचारीच मुजोर झाले आहे. त्यांच्यावर ‘मार्जीन’च्या राजकारणामुळे पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण उरलेले नाही. याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे निर्माण झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्याच्या मधोमध लावलेली झाडेही वाळली आहे. शहरात अनेक ठिकाणी गटार साचले असून त्याच्या दुर्गंधीने सामान्य जनता वैतागली आहे. स्तंभ, पुतळा परिसरांनाही विद्रूप स्वरूप आले आहे. रस्ते उखडले, नाल्या तुंबल्या, दुकानगाळे तुटले, ठिकठिकाणी अतिक्रमण अशी अवस्था आहे.
‘स्वच्छ व सुंदर’ शहर झाले इतिहासजमा
तीन आमदार असूनही शहराची उपेक्षा कायमच
पुसद शहराला काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप या तीन पक्षांचे आमदार आहेत. त्यांच्यामुळे पुसदच्या राजकीय वैभवात भर पडली असली तरी जनतेला दिलासा देणारे कोणतेही वैभव त्यांना अद्याप तरी पुसदसाठी खेचून आणता आलेले नाही. शहराची अवस्था पाहता या आमदारांचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे व त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांशी काहीएक सोयरसूतक नसल्याचेच स्पष्ट होते. त्यांनी या अवस्थेचा आढावा घेतल्याचे ऐकिवात नाही.