हैदराबादी काडतूस प्रकरणात पुसदच्या पिता-पुत्राला अटक
By admin | Published: February 6, 2016 02:33 AM2016-02-06T02:33:12+5:302016-02-06T02:33:12+5:30
हैदराबाद येथून काडतूस घेऊन येणाऱ्या तिघांचा आश्रयदाता असलेल्या पुसदच्या पिता-पुत्राला दराटी पोलिसांनी नांदेड येथून अटक केली.
दराटी पोलिसांची नांदेडमध्ये कारवाई : चार दिवसांची पोलीस कोठडी
उमरखेड : हैदराबाद येथून काडतूस घेऊन येणाऱ्या तिघांचा आश्रयदाता असलेल्या पुसदच्या पिता-पुत्राला दराटी पोलिसांनी नांदेड येथून अटक केली. यातील पित्याला पुसद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर मुलगा चार दिवस दराटी पोलिसांच्या कोठडीत राहणार आहे.
इम्तीयाज खान सरदार खान आणि त्याचा पिता सरदार खान अशी या आरोपींची नावे आहे. ते पुसदमधील रहिवासी आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री दराटी पोलिसांनी गस्ती दरम्यान हैदराबाद येथील तीन युवकांना अटक केली होती. त्यांच्याजवळून बंदुकीचे ६० काडतूस जप्त करण्यात आले होते. त्यांनी हा दारूगोळा आपण पुसद येथील इम्तीयाज खान सरदार खान याच्यासाठी नेत असल्याची कबुली दिली होती. त्यावरून इम्तीयाजच्या घराची झडती घेतली असता काडतूस, पासपोर्ट फोटो, बनावट राशन कार्ड आढळून आले होते. तेव्हापासून पोलीस इम्तीयाज व त्याचा पिता सरदार खान या दोघांच्या शोधात होते. गेल्या ४० दिवसांपासून ते पोलिसांना हुलकावण्या देत होते. त्यांनी वारंवार मोबाईलचे सीमकार्ड बदलून तसेच मुंबई, औरंगाबाद व अन्य शहरात फिरुन पोलिसांचा ससेमिरा चुकविला. दरम्यान हे दोघेही नांदेडच्या श्रीनाथ नगरात भाड्याने घर घेऊन राहत असल्याची टीप दराटीचे ठाणेदार सागर इंगोले यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजता सापळा रचून दोघांनाही अटक केली. इम्तीयाजचा पिता सरदार खान याला खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यात तो तीन वर्ष नागपूर मध्यवर्ती कारागृहात राहिला. दरम्यान त्याला संचित रजा मंजूर झाली होती. मात्र त्यानंतर तो कारागृहात परतलाच नाही. त्यामुळे पोलीस त्याच्या शोधात होते. त्याच्याविरुद्ध पुसद पोलीस ठाण्यात भादंवि २२४ कलमान्वये गुन्हा दाखल आहे. अखेर सरदार खानला पुसद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तर इम्तीयाजला उमरखेडच्या न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. इम्तीयाजच्या अटकेने हैदराबादवरून आलेले काडतूस नेमके कुण्यासाठी, यापूर्वी कितीवेळा दारूगोळ्याची खेप आली, बंदुका आणल्या का, हा दारूगोळा नेमका कुठे वापरला जात होता, येथून तो कुठे पुढे पास केला जात होता, अशा अनेक प्रश्नांची उकल करणे पोलिसांना सोईचे होणार आहे. (शहर प्रतिनिधी)