घुई येथील पाझर तलाव कोरडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:08 AM2019-02-10T00:08:09+5:302019-02-10T00:08:43+5:30
नेर तालुक्याच्या घुई शिवारातील पाझर तलाव फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडा पडला आहे. जागोजागी लिकेज असल्याचा हा परिणाम आहे. मात्र आता शेतकऱ्यांना रबीच्या सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनखास : नेर तालुक्याच्या घुई शिवारातील पाझर तलाव फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरडा पडला आहे. जागोजागी लिकेज असल्याचा हा परिणाम आहे. मात्र आता शेतकऱ्यांना रबीच्या सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. शिवाय जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे.
सन १९९० मध्ये या प्रकल्पाची निर्मिती झाली. दोन हेक्टर क्षेत्रात पाणी साठवण सुरू झाले. मात्र मागील दहा वर्षांपासून या तलावातील पाणी लिकेजमुळे वाहून जात आहे. पाण्याची साठवण क्षमता कमी झाल्याने आवश्यक तेवढे सिंचन होत नाही. तलाव लवकरच कोरडा पडत असल्याने गावशिवारातील विहिरीच्या पाण्याची पातळीसुद्धा खोल गेली आहे. तलावात पाणी नसल्याने आतापासूनच जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे.
तलावाच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी दारव्हा येथील उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद सिंचन उपविभागाकडे मागील दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र त्यांनी कधीच गांभीर्य दाखविले नाही. जानेवारी २०१९ मध्येही करण्यात आलेली तक्रार दुर्लक्षित आहे. आता नागरिक उपोषणाच्या पवित्र्यात आहे. तलावाची दुरुस्ती करावी, अशी मागणी फुलसिंग राठोड, उत्तम राऊत, सतीश राऊत, जागेश्वर मोटे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.