पुसद काँग्रेसला लागली उतरती कळा

By admin | Published: November 24, 2015 05:40 AM2015-11-24T05:40:27+5:302015-11-24T05:40:27+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुसद तालुक्यात एकेकाळी काँग्रेसचे चांगलेच वजन होते. गावागावात कार्यकर्ते होते.

Pushing the Congress to the decline | पुसद काँग्रेसला लागली उतरती कळा

पुसद काँग्रेसला लागली उतरती कळा

Next

अखिलेश अग्रवाल ल्ल पुसद
राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुसद तालुक्यात एकेकाळी काँग्रेसचे चांगलेच वजन होते. गावागावात कार्यकर्ते होते. शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असायची. परंतु गत काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा ना कोणता कार्यक्रम, ना सामाजिक हालचाली. जणू पुसद तालुक्यातील काँग्रेसला उतरती कळाच लागली आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसची हालत आणखी गंभीर झाली आहे. या निवडणुकीच्या काळात कुंपणावर असणारे पुढारी दुसरीकडे उड्या घेऊ लागले. अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्येही पक्षाच्या नेतृत्त्वावर विश्वास दिसत नाही. त्यांनी काँग्रेसशी तात्पुरता काडीमोड देखील घेतला आहे. मात्र याची फळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. काँग्रेसमुळे राष्ट्रवादीला मात्र चांगले दिवस आले. परंतु आजही यातून काँग्रेस धडा घ्यायला तयार नाही. पुसद शहरात स्वातंत्र्यापूर्वीपासून काँग्रेस भवन आहे. परंतु ही वास्तू गत २० वर्षांपासून अर्धवट बांधकाम झालेल्या अवस्थेत आहे. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी येथे दोनदा ध्वजारोहण होते. परंतु कार्यक्रमाला काही मोजकेच कार्यकर्ते हजर राहतात. एवढाच काय तो येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनशी संबंध. नंतर वर्षभरात कुणी नेतेच काय कार्यकर्तेही इकडे फिरकत नाही. काँग्रेसची राज्यात सत्ता असतानाही काँग्रेस भवनाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. यासाठी स्थानिक नेतेच जबाबदार असल्याचे बोलले जाते.
आता तर काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ असलेल्या महान विभूतींच्या जयंती व स्मृतिदिनाचा काँग्रेसला विसर पडला की काय, असे म्हणावे लागते. ३१ आॅक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन आणि १९ नोव्हेंबर रोजी जन्मदिन होता. या दोनही दिवशी पक्षाकडून साधा आदरांजलीचा कार्यक्रमही घेण्यात आला नाही. तर दुसरीकडे शहर काँग्रेस प्रायव्हेट लिमिटेड झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये विभाजन झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. १४ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. सचिन नाईक यांनी विश्रामगृहावर पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आपल्या काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरी केली. परंतु शहर काँग्रेस कमिटीला पंडित नेहरू यांच्या जयंतीचा विसर पडावा ही आश्चर्याची बाब आहे.
एकेकाळी काँग्रेसचा गड पुसद तालुका मानला जायचा. १३ वर्षे ज्यांनी राज्याची धुरा आपल्या हातात ठेवली, असे नेतृत्त्व दिले. त्याच काँग्रेस पक्षाला सुस्ती चढण्याचे कारण काय, याचा शोध घेण्याची गरज आहे. २०१६ मध्ये नगरपरिषद निवडणूक आणि २०१७ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. तेव्हा आत्ताच मरगळ झटकून कामाला लागण्याची गरज आहे. अन्यथा या मरगळीचा फायदा दुसरेच घेतील यात शंका नाही. काँग्रेसने वेळीच धडा घेतला नाही तर काँग्रेस तालुक्यातून हद्दपार झाल्याशिवाय राहणार नसल्याचे जाणकर सांगतात.

Web Title: Pushing the Congress to the decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.