उन्हाच्या चटक्यांनी पुसदकर हैराण
By Admin | Published: May 8, 2017 12:22 AM2017-05-08T00:22:17+5:302017-05-08T00:22:17+5:30
अंग भाजून काढणारे उन्ह, लाहीलाही करायला लावणारा असह्य उकाडा, रस्त्याने चालताना सुटणाऱ्या घामाच्या धारा
वैशाख वणवा : माणसांसोबत जनावरेही शोधत आहेत सावलीचा आधार
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : अंग भाजून काढणारे उन्ह, लाहीलाही करायला लावणारा असह्य उकाडा, रस्त्याने चालताना सुटणाऱ्या घामाच्या धारा अशी काहीशी अवस्था पुसदकरांची झाली आहे. विदर्भातील हॉट सिटी असलेल्या पुसदमध्ये सध्या पारा ४४ अंशाच्यावर आहे.
पुसदच्या तापमानात गेल्या काही दिवसांपासून चढउतार जाणवत आहे. तरीही वातावरणात बाष्प नसल्याने उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून तापमानात वाढ होत असून, ४४ अंशापेक्षा अधिक तापमान गेल्याने पुसदकरांचा जीव कासावीस झाला आहे. वैशाख वणवा अनुभवत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण, उन्हाचा तडाखा असे संमिश्र वातावरण अनुभवयाला मिळत असल्याने जनता त्रस्त झाली आहे. घरात बसूनही घामाच्या धारा लागत असून, पंख्यातून येणारी हवाही गरी भासत असल्याने पुसदकरांना उकाडा असह्य झाला आहे. बाष्पयुक्त वाऱ्यामुळे उकाड्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. तसेच दिवसा उकाडा सहन करावा लागत असताना रात्रीचेही तापमान चढेच राहत असल्याने पुसदकरांच्या त्रासात भर पडली येते.
सकाळी ८ वाजेपासून उन जाणवायला लागते. दिवसभर त्याची तीव्रता कायम राहते. सायंकाळी साडे सहापर्यंत ही धग राहते. रखरखत्या उन्हात घराबाहेर जाणे कठीण होते. लग्नसराईचा दिवस असल्याने खरेदीसाठी ग्रामीण जनता
पुसदला उन्हाची तमा न बाळगता येतात.
मे महिन्यात लग्नसराई अधिक असल्याने लग्न समारंभात उपस्थित राहणाऱ्या नातेवाईकांचे उन्हामुळे हाल होत आहे. यावर्षी मार्च महिन्यांपासूनच उन्हाची तीव्रता अधिक होती. उन्हाच्या काहिलीने नागरिक घामाघूम होत असून, घराबाहेर पडतात त्याना विचार करावा लागत आहेत.
रुग्ण संख्येत वाढ
उन्हाची तीव्रता वाढल्याने उलट्या, मळमळ, ताप, डोकेदुखी, अंगदुखी असे आजार वाढले आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी दवाखान्यात रूग्णांची संख्येत वाढ झाली आहे.
भारनियमनाची भर
तापमान ४४ अंशापर्यंत पोहचला असतानाच त्यात भर म्हणून विजेचा लपंडाव व भारनियमनही सुरू आहे. पुसद शहरात केव्हाही वीज येते अन जातेही त्यामुळे विद्युत उपकरणे बंद पडत आहे. नागरिकांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे. विशेष म्हणजे भारनियमनाच्या वेळाही घोषित झालेल्या नाहीत, हे विशेष.